पिंपरी चिंचवड

सुरळीत पाणी पुरवठ्याबाबत  तारीख पे तारीख ; लोकप्रतिनिधी आता  गप्प का?

  • डिसेंबर २०२४, २०२५ नंतर आता महापालिकेने काढला आहे मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना गेल्या सात वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे.  शहराला पाणी पुरवठा करणारी पवना, आंद्रा धरण पूर्ण क्षमतेने  भरल्यामुळे शहराला दररोज सुरळीत व मुबलक, पुरेसा पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन डिसेंबर २०२४ ही वेळ दिली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रशासन आणि  लोकप्रतिधी यांनी डिसेंबर २०२५ हा मुहूर्त काढला होता.

पण आता ती तारीख जवळ आली असताना ही संबंधित काम पूर्ण न झाल्याने  महापालिका प्रशासनाने  मार्च २०२६ हा नवीन मुहूर्त शोधला आहे. आता तरी या नवीन मुहूर्ताला शहरवासियांना सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा व्हावा एवढ्या माफक इच्छा शहरवासियांकडून व्यक्त होत आहेत. अन्यथा हा मुहूर्त ही तारीख पे तारीख होऊ नये अशी माफक इच्छा करदाते व्यक्त करीत आहेत.

मात्र, भामा-आसखेड प्रकल्पातील जॅकवेल व पाईपलाईनचे काम संथ गतीने सुरु आहे.  डिसेंबर-२०२५ अखेर काम पुर्ण होईल, असे भाकीत करणाऱ्या  महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून व शहरातील लोकप्रतिनिधी यांनी केले होते. मात्र तो मुहूर्त ही साधता न आल्याने  आता  मार्च २०२६ चा नवीन  मुहूर्त शोधला आहे. हा नवीन मुहूर्त पुन्हा तारीख पे तारीख ठरू नये एवढ्या माफक अपेक्षा..!

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, आंद्रा धरणातून पाणी पुरवठा होत आहे. यामध्ये पवनामधून ५१० एमएलडी, आंद्रामधून १०० एमएलडी पाणी उचलण्यात येत आहे. तर भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. मात्र, भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाची मुदत संपली आहे. ठेकेदाराला गतवर्षीच काम पुर्णत्व करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही भामा आसखेड प्रकल्पातील जॅकवेल आणि पाईपलाईनचे काम अपुर्ण आहे. पाईपलाईनचे केवळ ५५ टक्केच काम पुर्ण झाले आहे. तर धरणात पाणी साठा प्रचंड असल्याने जॅकवेलचे काम सध्या बंद अवस्थेत आहे.

भामा आसखेड प्रकल्पाचे काम  डिसेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र, ठेकेदाराला मुदतवाढ देवून जॅकवेल, पंपिंग स्टेशन, भूमिगत जलवाहिनी आदी कामे काम अद्यापही सुरू आहेत. या प्रकल्पाची कामे पुर्ण होण्यासाठी मार्च २०२६ ची वाट पहावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पवना धरण व आंद्रा धरण योजनेसह एमआयडीसीचे पाणी घेवूनही शहराची तहान भागत नाही. ते पाणी शहराला कमी पडू लागले आहे.

खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी महापालिकेसाठी राखीव आहे. तेथून पाणी आणण्यासाठी धरणाजवळ मौजे वाकी येथे अशुद्ध जलउपसा केंद्र असणार आहे. केंद्रापासून ते तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत ७.३० किलोमीटर अंतराची १७०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ब्रेक प्रेशर टँकपासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी १८.८० किलोमीटर अंतराची १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. भूमिगत जलवाहिनीचे काम एकूण २६.१० किलोमीटर इतके आहे. जलवाहिनीचे काम आत्तापर्यंत ५५ टक्के झाले आहे. जागा ताब्यात येण्यास व इतर तांत्रिक कारणांमुळे ते काम संथगतीने सुरू आहे.

यंदा मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आहे. भामा-आसखेड धरण १०० टक्के भरले असून तेथे जॅकवेलचे बरोबर   पूल, स्थापत्य काम, यंत्र सामग्रीची जोडणी, पंपिंग स्टेशन, विद्युत जोडणी आदी कामे करता  तांत्रिक अडचणी येत असल्याने धरणाचे पाणी ओसरल्यानंतर जानेवारीनंतर ते काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे समजते. 

भामा-आसखेड प्रकल्पाचे  काम सुरु  आहे. धरणाजवळ जॅकवेल, पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. तसेच, भूमिगत जलवाहिनीचे कामात येणारे अडथळे दूर करून काम पूर्णत्वास नेण्यात येत आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करून शहराला १६७ एमएलडी पाणी देण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.