पिंपरी चिंचवडपुणे

भोसरी विधानसभेतील ‘जनसंवाद’ चा अजित पवारांना विसर ?

  • पिंपरी, चिंचवड मतदारसंघात नागरिकांचा उदंड प्रतिसाद

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन विधानसभा मतदारसंघापैकी पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांचा ‘जनसंवाद ‘ जनतेशी थेट संवाद हा उपक्रम पार पडला. दोन्ही मतदारसंघातील नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता ; परंतु भोसरी विधानसभा मतदारसंघातील या संवादाला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. याबाबत मतदारसंघातील पदाधिकारी कमी पडले आहेत की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच याचा विसर पडला आहे ? अशी चर्चा भोसरी विधानसभेतील नागरिकांच्यामध्ये आहे. का?अजित पवारांनी भोसरी विधानसभेकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जनसंवादच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी, सूचना आणि अडचणी थेट ऐकणे असा त्याचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरील नागरिकांचा विश्वास पुन्हा दृढ व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी हा उपक्रम  राज्यसह पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघात हाती घेतला आहे. 

  पिंपरी-चिंचवड शहरावर त्यांचे विशेष लक्ष आहे. त्यामुळे  शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जातीने उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतात. तसेच त्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त,पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पी एम आर डी ए चे आयुक्त, एम आय डी सी, महावितरण, पी डब्ल्यूडी व इतर विभागातील अधिकारी यांच्या लवाजम्यासह  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार उपस्थित असतात. जनसंवादच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या जनसंवाद ला शहरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

पिंपरी विधानसभेमध्ये पावणे पाच हजार तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात जवळपास चार हजार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामध्ये महापालिका, एम आय डी सी, पी एम आर डी ए , पोलीस यंत्रणा , महसूल विभागातील प्रश्नाचा सर्वाधिक समावेश असल्याचे दिसून आले आहे. जागेवर प्रशासकीय प्रश्न सोडविण्यात अजित पवार यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या जनसंवाद यात्रेला राज्यासह पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. याठिकाणी भाजपचे हॅट्रिक आमदार आणि कट्टर हिंदुत्वादी आमदार अशी ओळख निर्माण करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे खंदे समर्थक आमदार महेश लांडगे हे नेतृत्व करतात. भाजपचा शहरातील चेहरा अशी त्यांची ओळख आहे.  शहरात भाजपचे चार आमदार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार याना अंगावर घेण्याची धमक वेळोवेळी आमदार लांडगे करताना दिसत आहेत. तसेच शहराचा विकास हा भाजपच्या काळातच झाला असे ठामपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमात स्पष्टपणे मांडण्याचे धाडस फक्त तेच करत आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभा मतदार संघासह भाजपचा वारू रोखण्याचे काम करण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच  पालकमंत्री अजित पवार निश्चित प्रयत्न करणार हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही.

हे जरी खरे असले तरी पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदार संघानंतर जनतेशी थेट संवाद करण्यासाठी आयोजित जनसंवाद उपक्रम भोसरी विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेला नाही. या उपक्रमासाठी एक ते दोन वेळा वेळ देऊन ही त्या वेळेत हा कार्यक्रम होऊ न शकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात मरगळ निर्माण झाली आहे. येथील प्रमुख्य पदाधिकारी , कार्यकर्ते आपल्या परीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यात महायुतीमध्ये राज्यात सत्तेत असताना मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुतीमधील घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत.

त्यामुळे प्रत्येकजण आपला पक्ष वाढला पाहिजे यासाठी सध्या फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त दिसत आहे. त्यात  भाजपच्या केंद्रातील बड्या नेत्याने भाजप पक्ष कुबड्यावर चालत नाही असे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे. त्यात भोसरी मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ताकद देणारा जनसंवाद हा उपक्रम न झाल्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.