या मोर्चाला आमचा विरोध नाही; महायुतीतीलच मंत्र्यांचे सत्याचा मोर्चाला अप्रत्यक्षात बळ
- भाजपला धक्का
- मंत्री शिरसाट, मुश्रीफांनी केले मोर्चाचे अप्रत्यक्ष समर्थन
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
मुंबईत मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी,मनसे, डावे पक्ष सत्याचा मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाची राज्यभर चर्चा असताना महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्र्यांनी या मोर्चाला आमचा विरोध नाही; असे म्हणत याचे समर्थन केले आहे. अप्रत्यक्षरित्या विरोधकांच्या हा मध्ये हा मिळविल्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आज त्यांनी जो मोर्चा काढला आहे त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल ; मात्र या मोर्चाला आमचा विरोध नाही, असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मोर्चाला आमचा विरोध नाही : संजय शिरसाट
बोगस मतदार याद्या एकाच मतदारसंघात नाहीत, तर महाराष्ट्रामध्ये आहेत, ही सर्व घाण थांबली पाहिजे असे सर्व नागरिकांचे मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर मतदान होते, त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसतो. हा कोणता पक्ष करतो किंवा कार्यकर्ता करतो या वादात आता मी जात नाही. परंतु हे नसावे या मताचे आम्ही सुद्धा आहोत असे मोठे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केले आहे. या मोर्चावरही त्यांनी तोंडसुख घेतले. ही स्टंटबाजी आहे आणि यापूर्वी ते निवडणूक आयोगाला भेटले होते. लोकांना रस्तावर आणण्याचे कारण काय हे तेच त्यांनाच माहित आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरणे योग्य नाही असा आम्हाला वाटते असे शिरसाट म्हणाले.
याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही : हसन मुश्रीफ
काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झाले हे आपण पहिले आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. पण ज्यावेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते, त्यावेळी ही बाबा निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. पण ती संधी विरोधकांनी गमावली होती. कितीही यंत्र असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या आज १४० कोटीपेक्षा जास्त आहे. त्यातील वीस टक्के सोडले तर बाकीचे मतदार आहेत. मतदार यादीत काही चुका होतात. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. या चुका प्रशासन दूर करेलच. आजचा मोर्चा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांचा सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्यास आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करण्यास आमचे काहीही हरकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

