दादांना धक्का ; राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी घेतला भाजपचा अर्ज
- तरी ही भाजप देणार पिंपरी-चिंचवडमध्ये मित्रपक्षांना धक्का
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी इच्छुकांना उमेवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी शहरातून सर्वाधिक पसंदी दिसत आहे. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांच्या समर्थकांसह इतर पक्षातील इच्छुकांनी भाजपचे अर्ज घेतले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ‘अब की बार सौ’ के पार हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.
महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने डिसेंबर महिनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या एकूण २९ पैकी महत्वाची महापालिका असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दृष्टीने शहरातील सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राज्याच्या सत्तेत एकत्रित असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.), शिवसेना (एकनाथ शिंदे ) महायुती आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.), उबाठा, काँग्रेससह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आर पी आय, आप, वंचित व इतर पक्षांनी तयारी सुरु केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीतील घटक पक्ष असणारे भाजप आणी राष्ट्रवादी काँग्रेस हेच एकमेकांचे खरे प्रतिस्पर्धी आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजप बरोबर युती करण्याच्या तयारीत आहेत. तर महाविकास आघाडी एकत्रित लढण्याच्या तयारीत आहे. मात्र यातील मुख्य घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)
गट राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) बरोबर युती करणार की नाही? याबाबत सस्पेन्स आहे तो आचारसंहिता लागू झाल्यानंतर समजणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने सर्वाधिक तयारी केली आहे. त्यामध्ये ते यशस्वी होताना दिसत आहेत.१२८ जागेसाठी जवळपास ८५० अर्ज गेले आहेत.
भाजप हा तत्कालीन महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्याकडे दोन विधानसभेचे दोन आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेचे दोन आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे असे एकूण चार आमदारांची फौज, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांची मोठी फौज आहे. केंद्र आणि राज्यातील सत्ता त्यामाध्यमातून झालेली विकासकामे या जोरावर भाजप सध्या जोरावर आहे. १२८ जागेसाठी जवळपास ८५० पेक्षा जास्त अर्ज गेले आहेत. आता त्या अर्जामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गटातील काही प्रमुख इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी शहरातील इच्छुकांकडून पसंदी मिळताना दिसत आहे.
तो निर्णय फक्त नावालाच आहे का?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्ष वाढविण्यासाठी मोठी संधी असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होताच राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणी शिवसेना पक्षातच एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडण्याची जणूच स्पर्धाच लागली होती. त्यावरून महायुती फुटणार अशा पर्यंत चर्चा गेल्यानंतर तिन्ही पक्षातील प्रमुखांनी चर्चा केल्यानंतर एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. हा नर्णय सर्वानुमते घेतला असला तरी ही तिन्ही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरूच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा आहे.
प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रवेश उमेदवारीनंतरच ?
भारतीय जनता पक्षांकडून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांना अर्ज स्वीकृतीचे काम सुरु झाले आहे. १२८ जागेसाठी भाजपकडून ८५० पेक्षा जास्त अर्ज गेले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.), शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षातील माजी महापौर, माजी नगरसेवक यांच्यासह ३५ जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये काही दोन नंबर च्या पदाधिकाऱ्यांनी अर्ज घेतले आहेत. तर प्रमुख पदाधिकारी भाजप मध्ये उमेदवारी चा शब्द आणि प्रवेश झाल्यानतर अर्ज घेऊन भरून देणार आहेत अशी चर्चा भाजप आणि शहराच्या राजकारणात आहे.
हॊ संबंधितनी अर्ज घेतले आहेत
महापालिका निवडणुकीसाठी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. जवळपास ८०० पेक्षा जास्त अर्ज घेतले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.), शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षातील काही जणांनी अर्ज घेतले आहेत. त्यांना प्रवेश द्यायचे की नाही हे प्रदेश पदाधिकारी ठरवतील. भाजप कडून लढविण्यासाठी येवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने शहरातील पक्षाच्या कामावर शहरवासियांचा विश्वास व्यक्त होत आहे.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी-चिंचवड

