पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ९ नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे मंजूर
- ३ पोलीस उपायुक्त (डी सी पी ) आणि ६ सहायक पोलीस आयुक्त (ए सी पी ) पदांचा समावेश
- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात क्षेत्रातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पाऊल
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ९ नवीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये ३ पोलीस उपआयुक्त (DCP) आणि ६ सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांचा समावेश आहे.



गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, या पदांसाठी येणाऱ्या रु. १ कोटी ९३ लाख ४६ हजार ७६० रुपये इतक्या वार्षिक खर्चास तसेच रु. १ कोटी २८ लाख ६८ हजार १५१ रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रस्तावानुसार तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या पदांमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि गुन्हेगारीच्या आव्हानांना अधिक प्रभावीपणे तोंड देता येणार असून, पोलीस प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून तो डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करण्यात आला आहे.

