भाजपची २०१७ ची रणनीती राष्ट्रवादीने अवलंबण्यास केली सुरूवात
- प्रभाग निहाय पॅनेल मजबूत करण्यावर राष्ट्रवादीचा फोकस
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी -चिंचवड महापालिका निवडणुकीत २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेचे साठपेक्षा जास्त माजी नगरसेवक फोडून त्यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देत राष्ट्रवादीची २५ वर्षाची सत्ता उलथून टाकण्यात यश मिळविले होते. तीच रणनीती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवलंबून भाजपसह शिवसेनेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
२०१७ ते २०२२ असे पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर महापालिका निवडणूक होणे आवश्यक होते ; मात्र ओ बी सी आरक्षणामुळे ही निवडणूक पुढे ढकलली. त्याला जवळपास साडे तीन ते पावणे चार वर्षे उलटली. महाराष्ट्रात ही २९ महापालिकांच्या निवडणुका या न्यायालयीन लढाईत अडकल्या होत्या. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिल्याने निवडणूक विभागाने प्रलंबित निवडणुका घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीच्या साठी २ डिसेंबर ला मतदान पार पडले. राहिलेल्या निवडणुका दिनांक २० डिसेंबर रोजी होणार आहेत. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दिनांक १५) पत्रकार परिषद घेत राज्यातील २९ महापालिका निवडणुका साठी कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष सरसावले आहेत. मुंबई बरोबर राज्याचे लक्ष पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकाकडे लागले आहे. २०१७ पर्यंत येथे फक्त अजितदादा यांची एकहाती सत्ता होती. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी च्या माध्यमातून अजितदादा पवार यांची सत्ता भाजपने उलथून टाकली होती. २०२६ च्या निवडणुकीत राज्यात महायुती म्हणून सत्ते असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटापैकी भाजप शिवसेना युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकमेकांसमोर मैत्रीपूर्ण लढणार आहेत. त्यादृष्टीने अजितदादा यांनी पिंपरी-चिंचवड मधून भाजप, शिवसेना आणि इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथील पक्षातील प्रमुख पदाधिकारी, इच्छुक यांच्याशी बोलून प्रत्येक प्रभागात निवडून येण्यासाठी कोणत्या बाजू उत्तम आहेत, कोणत्या बाजू कुमकुवत आहेत याबाबत आढावा घेऊन जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे तेथे भाजप, शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांचा प्रवेश निश्चित केले. त्यांच्याशी अगोदर प्रमुख पदाधिकारी बोलून नंतर त्यांचीशी वन टू वन अजितदादा बोलून प्रभागनिहाय राष्ट्रवादी काँग्रेचे उमेदवारी निश्चित करण्यात येऊ लागली आहे. त्यासाठी त्यांनी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील प्रभागानुसार प्रयत्न सुरु केले आहेत.

