बातम्यामहाराष्ट्रराजकीय

महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ ला मतमोजणी 

  • २३ डिसेंबर ते १६ जानेवारी दरम्यान २५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

ठाण्यासह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ०३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका या गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामध्ये सुरुवातीला ०२ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. आता त्यानंतर राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर
  • अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर
  • उमेदवारी माघारीची मुदत – ०२ जानेवारी
  • चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – ०३ जानेवारी
  • मतदान – १५ जानेवारी
  • निकाल – १६ जानेवारी

राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली आहे. त्यासोबत जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आली असल्याने त्यामध्ये नावे वगळण्याचे अधिकार राज्य आयोगाला नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

एकूण मतदार – ३.४८ कोटी

एकूण मतदार केंद्र – ३९,१४७

मुंबईसाठी मतदार केंद्र – १०,१११

कंट्रोल यूनिट – ११,३४९

बॅलेट यूनिट – २२,०००

मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित २८ महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे.

निवडणुका होणाऱ्या महापालिकेची नावे व पुढे नगरसेवक संख्या 

१) बृहन्मुंबई – २२७

२) भिवंडी-निजामपूर – ९०

३)  नागपूर – १५१

४)  पुणे – १६४

५)  ठाणे – १३१

६) अहिल्यादेवीनगर – ६८

७) नाशिक – १२२

८) पिंपरी-चिंचवड – १२८

०९) छत्रपती संभाजीनगर – ११३

१०)  वसई-विरार – ११५

११)  कल्याण-डोंबिवली – १२२

१२)  नवी मुंबई – १११

१३) अकोला – ८०

१४)  अमरावती – ८७

१५)  लातूर – ७०

१६)  नांदेड -वाघाळा – ८१

१७)  मीरा-भाईंदर – ९६

१८)  उल्हासनगर – ७८

१९) चंद्रपूर – ६६

२०)  धुळे – ७४

२१)  जळगाव – ७५

२२)  मालेगाव – ८४

२३)  कोल्हापूर – ९२

२४)  सांगली -मिरज-कुपवाड – ७८

२५) सोलापूर – ११३

२६)  इचलकरंजी – ७६

२७)  जालना – ६५

२८)  पनवेल – ७८

२९) परभणी – ६५