महाराष्ट्रराजकीय

मित्रपक्षासाठी जुळवून घ्या ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांचा सल्ला वजा आदेश

  • आमचे सर्वाधिक आमदार असताना मुख्यमंत्री पदाबाबत भाजप ने तडजोड केली होती
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आठवण करून दिल्याची चर्चा
  • एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार जागा वाटपाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीला रवाना

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन डेस्क

आमच्याकडे सर्वाधिक आमदार असताना ही आम्ही मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड केली होती ; त्यामुळे उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मित्रपक्षासाठी जागांची तडजोड करावी असा सल्ला वजा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दिल्लीला रवाना झाल्याचे महायुतीच्या गोटातून समजते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर ला होणार आहे. त्यादृष्टीने सर्व पक्षात जागा वाटपाचा तिढा सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या महायुती मध्ये ही जागा वाटप राज्य स्तरावर बोलणी झाली असून अंतिम यादी मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीला रवाना झाल्याचे महायुतीच्या गोटातून समोर आले आहे.

महायुतीमध्ये भाजप १५६, शिवसेना एकनाथ शिंदे ८०, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ५२ जागा देण्यात आल्याचे समजते. ज्या त्या पक्षांनी आपापल्या मित्र पक्षांनाही मिळालेल्या जागेतून त्यांना उमेदवारी देण्याचे ही ठरले आहे ; परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला ८० तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ६० जागा मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे समजते.