पिंपरी चिंचवडपुणेबातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीयसांगलीसातारा

सातारा जिल्हा परिषद  राडा ; आज अजितदादा असते तर..!

  • लोकप्रतिनिधीना  हात लावण्याची पोलिसांची हिंमत झाली असती का ?
  • सत्तेतील घटक पक्षाना जागेवरच  विचारले असते प्रश्न

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचे राजकारण केंद्रस्थानी आहे. राज्यात सत्तेत असणारे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मिनी विधानसभा समजले जाणाऱ्या  जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवरून नाराजीनाट्य सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. आपण ही सत्तेत असताना  भाजप आपली गळचेपी करत असल्याचा आरोप शिवसेना मंत्री आणि आमदारांनी  केला आहे. आपण या गोष्टीला विरोध केला नाही आणि हे असेच राहिले तर ते भविष्यात आपल्या पक्षासाठी हे धोरण मारक ठरेल, अशी आक्रमक भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत  झालेल्या  बैठकीत चिंता  व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही अजितदादा यांच्या पश्च्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मवाळ भूमिका  दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोध करण्यात शिवसेने एवढी आक्रमकता दिसून येत नसल्याने या घडीला अजितदादा असते तर ..! अशी आठवण सातारा जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांच्यामध्ये उमटताना दिसत आहे.


सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवरून राज्यात सत्तेत असणारे भाजप , शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच राजकीय  राडा, नाराजीनाट्य पहावयास मिळाले.  सातारा जिल्हा परिषडेमध्ये एकूण ६५ जागांचे बलाबल आहे.त्यापैकी भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १५, काँग्रेस ०१, स्वाभिमानी ०१, अपक्ष ०१ अशा जागा निवडून आली होत्या. एका अपक्ष सदस्याने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे २८ संख्याबळ झाले होते. तर बाकी ३७ सदस्यांचे बलाबल हे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्याकडे दिसलें. या गटाचे नेतृत्व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि यांनी अध्यक्ष आमचाच होणार असता विश्वास व्यक्त केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पुनर्वसन मंत्री  मकरंद पाटील यांनी दुजोरा दिला होता. 

तर काही झाले तरी अध्यक्षपदावर भाजप सदस्यच विराजमान होणार असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री  शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला होता. भाजपला पाच मतदानाची आवश्यकता होती. गोरे आणि भोसले यांनी कोरेगाव विधानसभा  शिवसेनेचे आमदार महेश शिंदे याना बरोबर घेऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वासाला तडा दिला. भाजपचाच सदस्याला अध्यक्षपदावर विराजमान केले. प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. (कोरेगाव विधानसभा  शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी कमळ या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणूक लढवली होती. )

या निवडीच्यावेळी राज्यात सत्तेत असणारे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच संघर्ष पाहावयास मिळाला. या राड्यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई हे जखमी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील याना पोलिसांनी भाजप मंत्र्यांच्या इशाऱ्यावर धक्काबुकी आणि मारहाण  केली असा आरोप  पत्रकार परिषद घेऊन केला. त्याला मकरंद पाटील यांनी ही दुजोरा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदानापासून वंचित ठेवले. तर बापू शिंदे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार द्यावयास लावल्याचा आरोप ही  यावेळी भाजपवर करण्यात आला.

  प्रत्यक्षात जिल्हा परिषद सदस्य बापू शिंदे हे आमच्याबरोबरच होते. माझे अपहरण  करण्यात आले नव्हते, असा निर्वाळा खुद्द बापू शिंदे यांनी पोलिसांना दिला.  तरी ही  जर पोलीस प्रशासन भाजपच्या इशाऱ्यावर पालकमंत्री, मंत्री याना धक्काबुक्की, मारहाण करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न सातारा जिल्हा पालकमंत्री देसाई यांनी विधान परिषद आणि विधानसभा अधिवेशनात मांडला. त्यावरून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह  दोन पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्याचे आदेश उपसभापती  नीलम गोऱ्हे  यांनी दिले. या आदेशला   भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध दर्शविला.

या सर्व घडामोडीमध्ये एका राज्यकर्त्यांची उणीव सर्व सातारा जिल्हा वासियांसह राज्यातील नागरिकांना भासली,  ती म्हणजे  दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची. सातारा जिल्ह्यावर अजितदादा यांचे विशेष लक्ष असायचे. त्यामुळे या राड्यानंतर त्यांची आठवण होणार नाही असे होऊच शकत नाही. ते हयात असते तर सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीमध्ये जो राडा झाला, तो झाला असता का ? पोलीस प्रशासन म्हणा किंवा भाजपचे मंत्री एवढे आक्रमक झाले असते का ? स्वतःचा पक्ष वाढविण्याचा  प्रत्येकाला हक्क आहे ; मात्र तो सत्तेच्या जोरावर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून नव्हे असे खडे बोल त्यांनी निश्चित सर्वच पक्षीय मंत्र्यांना सुनावले असते,  अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त करीत  आहेत. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर आहे अशी म्हणाची धमक ठेवणारा महाराष्ट्रातील हा एकमेव नेता होता अशा आठवणीला उजाळा मिळाला आहे.              

 सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत जो गोंधळ झाला तो अजितदादा असते तर झाला असता का ? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यावर सातारा पोलीस यंत्रणेने जुने गुन्ह्याचे पुरावे देऊन त्यांना अटक करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवले असते का ? जिल्हा परिषद आवारात पोलीस प्रशासनाने जी वागणूक मतदानासाठी मुख्य प्रवेशद्वारातून आत येणाऱ्या सदस्यांना दिली ती  वागणूक पोलीस यंत्रणेने अजितदादा असते तर दिली असती का ? एका पालकमंत्र्याबाबत तो कोणत्या ही पक्षाचा असो ज्या प्रकारे  पोलीस प्रशासनाने घेतलेली भूमिका,    याबाबत विधानसभा अधिवेशनात सत्तेत असताना गृह विभागावर प्रश्नाचा भडीमार करून  याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असती.  जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली असती, मग त्याच्यासाठी सत्ता आहे का ती जाईल याचा विचार ही केला नसता अशा प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणासह सर्वसामान्य जनता व्यक्त करताना दिसत आहे.    

______________________