सभा विशेष अर्थसंकल्पाची ; चर्चा मात्र भोसरीतील विकास कामाच्या श्रेयाची
-सुलभा उबाळे आणि संदीप वाघेरे नी ठेवले कार्यप्रणालीवर बोट
-आमदार समर्थक नगरसेवकांनी ही दिले तोडीस तोड उत्तर
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये साडे चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर २०२६-२७ या वर्षासाठी अर्थसंकल्पीय विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच जवळपास पाच हजार कोटी रुपयाचे दायित्व आहे. त्यामुळे १२८ नगरसेवक यांना त्याच्या प्रभागात मिळणारा निधीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दिनांक २४) अर्थसंकल्पीय विशेष सभेचे आयोजन केले होते. नगरसेवकांनी प्रभागातील समस्या मांडण्याबरोबरच कोणत्या कामाना प्राधान्य द्यावे याबाबत मते व्यक्त केली. अनेक नगरसेवकांनी तत्कालीन आयुक्त आणि महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान विशेष सभेमध्ये सर्वाधिक आक्रमक चर्चा भोसरी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकास कामावरून झाली. कामे महानगरपालिकेची आणि श्रेय कोणी दुसरेच घेत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघांचे आमदार महेशदादा लांडगे यांचा नमोल्लेख टाळून केला. त्याला आमदार समर्थक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आक्षेप घेतला. ज्यानी ही कामे मंजूर केली आहेत, ज्यांनी या कामाच्या संकल्पना मंडली, त्यासंदर्भात विधानसभा यथे आग्रही मागणी केली, त्यासाठी लागणारी जागा, निधी मिळवून दिली त्यांचे किमान आभार तरी माना असे खडे बोल विशेष सभेत सुनावले. तसेच त्यांनी लोकांची कामे केली म्हणूनच आमदारकीची हॅट्रिक केली ना असे सुनवायला ही ते कमी पडले नाहीत.
ही विशेष अर्थ संकल्पीय सभा महापौर रवी लांडगे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित पार पडली. शिवसेनेच्या नगरसेविका उबाळे यांनी तत्कालीन प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढले. तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांची चौकशी लावा अशी मागणी केली. त्याअनुषंगाने त्यांनी मोशी येथील कचरा डेपो आणि बोऱ्हाडेवाडी येथील विनायक नगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळ्यासाठी वीस कोटी रुपये खर्च करुन उभा केलेला चौथरा चा विषय छेडला. विनायकनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च करुन चबूतरा उभा केला होता. त्या अरुंद जागेवर टीका झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे स्थलांतर प्राधिकरण जागेत करण्यात करण्यात आले. आणि आता विनायकनगरच्या जागेवर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळा उभा करण्यासाठी प्रयत्न सूर केले आहेत. आमचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पुतळ्याला विरोध नाही. त्यांचा पुतळा हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी झाला पाहिजे अशी आग्रही मागणी उबाळे यांनी यावेळी केली.
पण छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामात ही भ्रष्टाचार होत आहे. हे आम्ही खपून घेणार नाही अशी भूमिका उबाळे यांनी मंडली. त्यानंतर त्यांनी मोशी येथील कचरा डेपो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरणे आहे असा आरोप केला. कचरा गोळा करण्यापासून ते मायनींग पर्यंत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत आहेत. त्याबाबत काही माहिती विचारली की कचरा डेपोला आग लागत असल्याचे कारण देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असल्याची टीका केली. पोलीस आयुक्तालंय व इतर कामे ही शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी मंजूर केली आहेत. त्यांना त्याचे श्रेय घेता आले नाही. त्यामुळे हे भोसरीकरांनी मंजूर केले असे म्हणता येणार नाही. त्याबाबत ही कामे कोणी मंजूर केलीत हे सर्व शहराला माहीत आहे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मांडली.
सुलभा उबाळे आणि संदीप वाघेरे यांनी उपस्थित केलेल्या भ्रष्टाचार आणि श्रेयाच्या आरोपावर भोसरीतील विशेषकरून समाविष्ट गावातील आमदार लांडगे समर्थक नगरसेवकांनी आक्षेप घेतला. माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी जोरदार प्रत्यत्तर दिले. राहुल जाधव यांनी तर सुलभा उबाळे यांना ‘कही पे इशारा तो कही पे निगाहे’ म्हणतं शायरीतून टोला लागवला. भोसरी विधानसभेमध्ये जगातील सर्वात मोठा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा रहात आहे, त्याचा महाराष्ट्रातील नागरिकांना अभिमान आहे. त्याची संकल्पना आमदर महेशदादा यांची आहे. त्यासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत, प्राधिकरणाची जागा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
शहराचा कचरा मोशीत कचरा डेपोत टाकला जातो. कचरा डेपोचे आरक्षण पुणावळ्याला होते. ते आता रद्द झाले आहे. परंतु पूर्ण शहराचा कचरा येथे टाकल्याने कचऱ्याचे डोंगर उभे राहीले होते. मोशीकारांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यातून सुटका करण्याचे काम वेस्ट तू एनर्जी माध्यमातून आमदार महेश दादा यांनी केले. पोलीस आयुक्तालंय, सी ओ पी महाविद्यालय, खंडपीठ न्यायालय , संतपीठ उभा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हे भोसरी नव्हे शहराला अवगत आहे. त्यामुळेच ते तीन वेळा आमदर म्हणून निवडूण आले आहेत.
नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी ही सुलभा उबाळे आणि संदीप वाघेरे यांच्या प्रश्नावर जोरदार पलटवार केला. मोशीकर दुर्गंधीमध्ये जीवन जगत होते. त्यावेळी मोशीकरानी अनेक वेळा आंदोलन केले. त्यावेळी जे आता कचरा डेपो आणि वेस्ट टू एनर्जी मध्ये भ्रष्टाचार आहे म्हणतं आहेत त्या ही या आंदोलनात सहभागी असायच्या. त्यावेळी का नाही सुटला हा प्रश्न? महेशदादा आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील आणि विशेषकरून मोशी ग्रामस्थांच्या मागणीच्या अनुषंगाने कचरा डेपोतील कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी वेस्ट टू एनर्जी ची संकल्पना पुढे आणली. त्यासाठी प्रयत्न केले. आता कचऱ्याचे डोंगर कमी झाले आहेत. येथे वीज निर्मिती होत आहे.
फक्त आरोप केले की होत नाही, त्यासाठी काम करावे लागते. आणि ते आमदार महेशदादा उत्तमरित्या करत असल्याने त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली आहे. कचरा डेपो येथील बफर झोनची हद्द कमी झाल्याने या भागातील विकास कामाला गती मिळाली आहे. प्राधिकरणातील साडे बारा टक्क्याचा विषय कोणी मार्गी लावला, शास्ती कराचा विषय कोणी हाता वेगळा केला हे सर्व शहर वासियांना ज्ञात आहे. त्यामुळेच ते पाच लाख नागरिकांचे नेतृत्वा करण्यात सलग पंधरा वर्षे यशस्वी होताना दिसत आहेत.

