शिराळा नगरपंचायत : भाजप एकला चलो रे चा नारा ?
-निवडणुकीत युती तर इतरवेळी दोस्ताना का नाही
–आमचा पक्ष वाढविण्याचा आम्हाला अधिकार; नगरसेवकाचा दावा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
शिराळा नगरपंचायतचे भारतीय जनता पक्षाचे नऊ नगरसेवक आहेत. त्यांनी आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे सोमवारी (दिनांक २३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिराळा शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध मागण्याचे निवेदन दिले. हे जरी खरे असले तरी शहराचे प्रथम नागरीक नगराध्यक्ष यांना डावलून ही भेट घेतली. नगरपंचायत निवडणुकीमध्ये युती म्हणून भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढविली. युतीचे उमेदवार निवडूण येण्यात दोन्ही पक्षाचे योगदान आहे. मुख्यमंत्री हे एका पक्षाचे नसतात. त्यामुळे शिराळा शहरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मागण्या करताना प्रथम नागरीक असणाऱ्या नगराध्यक्ष यांना बरोबर घेणे आवश्यक होते, अशा प्रतिक्रिया शिराळच्या राजकारणात उमटल्या आहेत ; मात्र मिनी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षात सत्तासंघर्ष वाढला आहे ; त्याचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये ही उमटताना दिसत असल्यानेच युतीच्या नगराध्यक्ष यांना डावलून भाजपचा एकला चलो रे चा नारा? दिल्याची चर्चा आहे.
नगरपंचायत कार्यालय इमारत बांधणे , नवीन पाणी पुरवठा योजना आणि शहराचा नूतन विकास आराखडा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यांचा समावेश असणारे निवदेन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले आहे. नगरपंचायतवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. नगराध्यक्षासह तीन नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे मतदान चालते ? तर मग विकास कामामध्ये आणि त्याची मागणी करण्यात एकत्रितपणा का चालत नाही ? अशी चर्चा शिराळा शहरात रंगली आहे. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. हे जरी खरे असले तरी शहर म्हणून ज्यावेळी मागणी होते त्यावेळी युती म्हणून सत्ता असताना मुख्यमंत्री याना भेटताना, शिराळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पृथ्वी नाईक यांना बरोबर घेणे आवश्यक होते.(इतर वेळी नेहमी आम्ही एकसंघ आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातोच की ?)अशा प्रतिक्रिया शहरात उमटल्या आहेत.
सोमवारी शिराळा नगरपंचायतीचे भाजपचे नऊ नगरसेवकांनी आमदार सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मुख्यमंत्री यांची भेट घेतली. नगरसेवकांनी एक निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने नगरपंचायत कार्यालय इमारत बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजना, शहराचा नुतन विकास आराखडा करणे, घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी एम.आय.डी.सी. येथे जागा उपलब्ध करणे, भुयारी गटार योजना, उद्यान, बागबगीच्यासाठी निधी मिळावा अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी कमी पडून देणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सत्यजित देशमुख, उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे, नगरसेवक केदार नलवडे, रमेश कांबळे, सचिन डांगे, विद्याधर कुलकर्णी, राम जाधव , कुलदीप निकम, महेश पाटील आदी उपस्थित होत.
मिनी विधानसभा समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षात संघर्ष पहावयास मिळत आहे. जिल्ह्याचे राजकारण हातात घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष , उपाध्यक्ष व इतर सत्ता स्थाने ताब्यात ठेवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. मंत्रिमंडळात एकत्रित काम करणारे मंत्री एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातून पालकमंत्री, मंत्र्यावर सत्तेच्या जोरावर रोभ जमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवरून शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मंत्र्यांमध्ये झालेला संघर्ष पूर्ण राज्याने पहिला. त्याचे तीव्र पडसाद विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशनात सोमवारी पहावयास मिळाला. आता त्याचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये ही दिसून लागले आहेत. शिराळा शहराच्या विकासासाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम करणारे भाजप आणि शिवसेना युतीतील भाजपचे नगरसेवकांनी स्वतंत्र निवदेन देऊन निधी देण्याबाबत साकडे घातले.
याबाबत नगरसेवक केदार नलवडे याना संपर्क साधला असता ते म्हणाले की, निवडणूक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्याअनुषंगाने आम्ही सोमवारी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सत्यजित देशमुख उपस्थित होते. शिराळाच्या विकासाच्या दृष्टीने निवदेन दिले. यावेळी त्यांनी विकासाला निधी कमी पडून देणार नाही असा शब्द दिला आहे. ही आमची पक्षीय भेट होती. आम्हाला ही आमचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजप आणि शिवसेना यांची युती अभेद्य आहे आणि राहणार.
_______________________________

