पुणेमहाराष्ट्रराजकीय

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे नेण्यास सत्यजित तांबे यांचा विरोध

रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कुठलाही बदल न करता तो संगमनेरमधून नेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक : प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी आता शिर्डीमार्गे वळवण्याचे नियोजन केले जात आहे. या मार्गाच्या मूळ आराखड्यानुसार तो संगमनेर तालुक्यातून जाणे अपेक्षित असताना ऐनवेळी हा बदल का केला, असा प्रश्न उपस्थित करत आमदार सत्यजित तांबे यांनी उपरोक्त मार्ग शिर्डीमागे नेण्यास विरोध केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात कुठलाही बदल न करता तो संगमनेरमधून नेण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा रेल्वे मार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. हा मार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याचे नियोजन झाले होते. या रेल्वे मार्गामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता. तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने सर्वांनी त्याचे स्वागत केले होते, ही बाब आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.