कोल्हापूर

महालक्ष्मी मंदिरासाठी ४० कोटी, पावनखिंड विश्रामगृहासाठी १५ कोटी मंजूर

करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ४० कोटी रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे.

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ४० कोटी रुपये रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला आहे. आधीच्या महाविकास आघाडीच्या काळात निधी कूर्मगतीने मिळत असताना आता मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

नगर विकास विभागाच्या या निर्णयात म्हटले आहे की, महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी प्रथम टप्प्यात ७९.९६ कोटी रकमेच्या कामांना २० फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता दिली होती. त्याकरिता २०१९-२०२० व २०२३ या वर्षांमध्ये १०. ७० कोटी निधी मंजूर केला आहे.

या आराखड्याच्या प्रथम टप्प्यात मंजूर निधी पैकी चालू आर्थिक वर्षात ६९.२६ कोटी इतका अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार ४० कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे. निधीपेक्षा जास्तीचे दायित्व घेण्यात येऊ नये तसेच कुठलाही शासन नियम, अधिकाराचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेशामध्ये म्हटले आहे.