वर्षभरात ४५ नव्या राजकीय पक्षांची नोंद, राज्यातील एकूण पक्षांची संख्या ३९६; निवडणूक आयोगाकडून माहिती
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात राज्य निवडणूक आयोगाकडे तब्बल ४५ नव्या राजकीय पक्षांची नोंद झाली आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये राज्यात ३५१ राजकीय पक्ष होते. डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांची संख्या ३७६ इतकी झाली. आता ती संख्या ३९६ वर पोचली आहे. राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नियमन करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना उमेदवार उभे करताना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाग घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करावी लागते.
प्रभाग निर्मिती व त्याची संख्या यासंदर्भातील विविध याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे.
कपिल पाटील यांचा नवा पक्ष
जनता दलाचे (संयुक्त )विधान परिषदेचे शिक्षक गटातील आमदार कपिल पाटील हे ३ मार्च रोजी नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. पाटील जनता दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याने पाटील यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीमध्ये पुढच्या आठवडय़ात पाटील यांनी मेळावा ठेवला आहे. तेथे ते समाजवादी जनता दल नावाने नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष देवेगौडा यांनी कर्नाटकात भाजपबरोबर आघाडी केल्याने राज्यातील त्या पक्षाच्या नेत्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात काही महिन्यापूर्वी प्रवेश केलेला आहे.