पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाची पुन्हा घडी बसविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पुण्याचे खासदार पैलवान मुरलीधर मोहळ यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी
- नगरसेवक ते केंद्रात राज्यमंत्री म्हणून राजकीय प्रवास
- कोरोना काळात पुण्याचे महापौर म्हणून उत्कृष्ठ कामगिरी
- महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून पहिल्यांदा लोकसभेत
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे (पुणे)
नरेंद्र मोदी यांनी रविवार (दिनांक ०९) तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण ६५ जणांनी शपथ घेतली. या मंत्री मंडळात महाराष्ट्राच्या सहा जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये नितीन गडकरी व उत्तर मुंबईतून पहिल्यांदा खासदार झालेले पियूष गोयल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा खासदार झालेले पैलवान मुरलीधर मोहोळ, रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बुलडाणा लोकसभेत ४ थ्यांदा खासदार झालेले प्रतापराव जाधव आणि आर पी आय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
परंतु पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत पोहचलेले खासदार पैलवान मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री करून पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात भाजपाची झालेली पडझड पुन्हा भरून काढण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. त्यांनी राज्य संघटनेत ही उत्तम काम केल्यामुळे केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मोहोळ यशस्वीपणे सांभाळतील असा विश्वास पक्षाने व्यक्त करीत त्यांच्यावर पक्षाने पहिल्यांदा निवडून येवून ही केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या लोकसभा मतदार संघात धोबिपछाड देण्यात भाजपाने महायुतीच्या माध्यमातुन मोठे यश संपादन केले होते. त्यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, सोलापूर, अहमदनगर, पुणे, मावळ येथे यश मिळविले होते. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (एकत्रित) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मतदार संघात भाजपाने यश मिळविले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होवून २०१९ मध्ये दोन वर्षे महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांनी एकत्रित येत महाविकास आघाडी म्हणून यशस्वी केला.
परंतु महाराष्ट्रातील भाजपाचे चाणक्य अशी ओळख मिळविलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीतील खदखद याचा फायदा घेत शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार फोडून महायुतीमध्ये सामील होवून महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ४२ आमदार गळाला लावून त्यांना महायुतीत समावेश करून घेतला.
त्यामुळे लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपा, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट म्हणून महायुतीच्या माध्यमातून तर काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट च्या माध्यमातून महाविकास आघाडी म्हणून एकमेकांसमोर लढले. परंतु महाविकास आघाडी ने नियोजनबध्द प्रचार, भाजपाच्या अजेंड्यावर केलेली टीका, महागाई, बेरोजगारी, संविधान बदलण्याचा मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला. तसेच महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्याने उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना मिळालेली सहनभुतीमुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मोठा विजय मिळविला. ४८ जागेपैकी ३१ महाविकास आघाडीला ( सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा) तर महायुतीला फक्त १७ जागेवर समाधान मानावे लागले.
त्यामुळे पुन्हा प. महाराष्ट्रात भाजपाला पुन्हा यश मिळवून देण्यासाठी पुण्याचे विद्यमान खासदार आणि ज्यांनी रविवारी राज्य केंद्रीय मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली असे उत्कृष्ठ नियोजक, खेळाडू , प. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राज्य संघटनेच्या माध्यमातून मजबूत केले संघटन यामुळे त्यांच्यावर प.महाराष्ट्रात पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी जबाबदारी देण्यात आल्याची पक्षात चर्चा असून ना.मोहोळ त्यात नक्की यशस्वी होतील असा विश्वास पक्षाला आणि त्यांच्या समर्थकांना आहे.