‘भोसरी’ चे राजकारण फिरतय लांडेंच्या भोवती ; ‘शेठ’कोणाकडे..?
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
राजकारणात कोणाला केव्हा महत्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही; कारण ते अनिश्चिततेचा खेळ आहे. युवक, तरुणाची संख्या वाढली म्हणून ज्येष्ठांना आता आपण फक्त मार्गदर्शन करा असे म्हणून चालत नाही, आणि ते कोणी म्हणत असेल तर लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकीत ज्येष्ठांनी ज्या प्रमाणे राजकारण हातात घेवून येथे फक्त आमची मक्तेदारी असे म्हणविणाऱ्या सर्वच पक्षांना मोठी चपराक बसविण्यात ज्येष्ठांनी आपला अनुभव वापरून सिद्ध केले आहे.
त्यामुळे ज्यांचे राजकारणात योगदान असते त्यांना ते संपले म्हणणे किती महागात पडू शकते हे महाराष्ट्रातील अनेक लोकसभा निवडणुकीत निकालातून स्पष्ट झाले आहे. एकदा हवेली विधानसभा आणि एकदा भोसरी विधानसभा असे दोन वेळा विधानसभेचे विलास लांडे यांनी प्रतिनिधित्व केले. पिंपरी चिंचवड चे दुसरे शरद पवार अशी ही त्यांची ओळख असणारे विलास लांडे यांच्या भोवती २०२४ च्या विधानसभेचे राजकारण फिरत असल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत होवून ही त्यांनी त्यांचा गट शाबूत ठेवला आहे. त्यामध्ये त्यांना छुपा पाठिंबा असणाऱ्या शेकडो समर्थकांचा समावेश आहे.
त्यांचे आजमितीस सर्वच पक्षातील वरिष्ठांचे संबंध आहेत. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते. परंतु अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ने दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे लांडे यांनी मौन बाळगले. आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अजित पवार गटातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
लांडे हे सद्या महायुतीमध्ये आहेत. ते निवडणूक लढविणार आहेत की नाही हे त्यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केलेले नाही. ते वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत. त्यांचे सर्वच पक्षात उत्तम संबंध असल्याने ते कोणता डाव टाकतात याचे गणित इच्छुकांना सुटेना. ते अजित पवार गटातच राहणार की शरद पवार गटात जाणार याबाबत त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नसल्याने अनेक जण चिंतेत आहेत. तरी ही ते आमच्याबरोबर राहतील असे अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे तर जे शरद पवार गटात प्रवेश करणार होते ते म्हणतात ते आमच्याबरोबर राहतील.
विलास लांडे यांनी राजकारणात जवळपास ३५ वर्षे वेळ दिला आहे. त्याचबरोबर विविध उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामाध्यमातून त्यांनी शेकडो जणांना रोजगार दिले आहेत. मुले, मुलींना शिक्षणाची सोय करून दिली आहे. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राजकारणात कोणी ताम्रपट घेवून जन्माला आलेला नाही.
त्यामुळे राजकारणात काही काळ पराभव झाला म्हणजे तो संपला असे होत नाही असे ज्येष्ठ आपली मते त्यांच्याबाबत व्यक्त करीत असल्याने विलास लांडे पुन्हा भरारी घेतली असा विश्वास भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरीक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे ते भोसरी आणि शहराच्या राजकारणात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.