संकट काळात सोबत राहण्याऐवजी पळून गेले; त्यांचा हिशोब करायचा आहे : शरद पवारांनी साधला हसन मुश्रीफ यांचे नाव घेता निशाणा
- समरजित घाटगे यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश
- तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा; ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू
- शरद पवार यांची कागलच्या विराट जाहीर सभेत आश्वासन
लोकमान्य टाइम्स : कागल
आम्ही याच तालुक्यातील काही लोकांना साथ दिली, मोठं केलं. पण संकट काळात सोबत राहण्याऐवजी पळून गेले. त्यांचा हिशोब करायचा आहे. कागल तालुक्यानं कधी लाचारी स्वीकारली नाही. ईडीची धाड पडल्यावर त्यांच्याच घरातील महिला म्हणाली होती की, आम्हाला गोळ्या घाला. पण त्याच घरातील प्रामुख्याने लाचारी स्वीकारली, अशी टीका शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केली. “आता राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज (मंगळवारी दिनांक ३) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. पक्षप्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील कागलमध्ये गैबी चौकात समरजित घाटगे यांचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी दणकेबाज भाषण केलं. शरद पवारांनी आपल्या भाषणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. तसेच समरजित घाटगे यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी शरद पवारांनी समरजित घाटगे यांच्याबद्दल मोठी घोषणा केली. तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू, अशी मोठी घोषणा शरद पवारांनी केली.
जबरदस्त संख्येने तुम्ही समरजित घाटगे यांच्यासाठी उपस्थित राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला.
दोन दिवसांपूर्वी परदेशातून गहू आणण्याचा निर्णय घेतला, काय चाललं आहे या देशात? आपल्या देशातील शेतकरी १८ देशात गहू पुरवत होता”, अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली. तसेच “मी समरजित यांना विचारलं होतं की तुम्ही इतक्या चांगल्या प्रमाणे कारखाना चालवता बक्षीस मिळवता ही बक्षीस ठेवायला जागा आहे का?, असं शरद पवार म्हणाले.
तरुणांची कष्ट करण्याची तयारी आहे पण त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. राज्यात दररोज दोन चार बातम्या या महिला अत्याचाराच्या असतात. बदलापूरमध्ये घटना घडली, आरोपींवर कारवाई करायची सोडून आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचं काम केलं , अशी टीका शरद पवारांनी महायुती सरकारवर केली.
“मालवण इथं शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. गेट वे ऑफ इंडियावर ६० वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला पण त्याला काही झालं नाही. याठिकाणी ८ महिन्यात पुतळा कोसळला याचा अर्थ कामात भ्रष्टाचार झाला. आता या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.