महाराष्ट्रमुंबई

मराठा आरक्षण : महायुती सरकारला घरचा आहेर 

  • महायुतीचे मंत्री छगन भुजबळ आक्रमक 
  • मुंबई उच्च न्यायालयात मागणार दाद 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान येथे करण्यात आलेल्या आंदोलनानंतर महायुतीच्या सरकारने मराठा आरक्षणसंदर्भात अद्यादेश (जी आर ) काढून मराठा समाजाला दिलासा दिला होता. त्याच्या विरोधात ओबीसी समाजाचे नेते महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी या अद्यादेशाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायायात दाद मागणार असल्याचे समजते. 

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती. सरकारच्या या जीआरमुळे ओबीसी समाज नाराज झाला होता. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात दंड थोपटल्याने महायुती सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे.  

सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून ते विविध वकिलांसोबत चर्चा सुरु आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरु होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत.

येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील, अशी माहिती आहे. समीर भुजबळ हे या कायेदशीर लढाईची जबाबदारी सांभाळणार आहेत. मराठा समाजाने देखील ओबीसी समाज कोर्टात जाण्याची बाब लक्षात घेत आधीच कॅव्हेट दाखल केले आहे. मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय गंगाधर काळकुटे यांच्यावतीने ही कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली होती. छगन भुजबळ हे आता न्यायालयात जाणार असल्याने मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महायुतीच्या मंत्र्यांनी मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. यानंतर छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. या निर्णयानंतर ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. राज्य सरकारच्या नव्या जीआरमुळे संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये येईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मात्र, आता छगन भुजबळ यांनी या जीआरला न्यायालयात आव्हान? देणार असल्याने आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.