महाराष्ट्र

पंढरपूरात माघी वारीसाठी व्यापार पेठा सज्ज


प्रासादिक साहित्य भरण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग   

लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
आगामी माघीवारी  केवळ तीन दिवसावर येऊन ठेपली आहे.  वारीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी  प्रासादिक साहित्याचे व्यापारी, दुकानदार जय्यत तयारी करीत आहेत. साहित्य भरण्यासाठी दुकानदारांची लगबग सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. 

 माघी यात्रा गुरुवारी (दिनांक २९) पंढरपूर येथे भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यापैकी एक महत्वाची वारी म्हणून ओळखली जाते. यासाठी प्रामुख्याने मुंबई, ठाणे, कोल्हापूर, कोकण, गोवा, कर्नाटक या भागातील भावीक येतात. व्यापारी व दुकानदारांच्यात पळती वारी म्हणून ही वारी ओळखली जाते. कमी वेळेत जास्त उत्त्पन्न मिळवून देणारी वारी अशी ओळख असल्याने प्रासादिक साहित्यसह इतर आवश्यक सर्व प्रकारचा माल भरण्यासाठी व्यापारी आणि व्यवसायिकांच्यात लगबग सुरु झाल्याचे पाहावयास मिळत आहे.  

या वारीसाठी विशेष करून मुंबई, गुजरात येथून मोठ्या प्रमाणावर माल येतो. हा माल ने-आण करण्यासाठी  विविध ट्रान्स्पोर्टची अवजड वाहने मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत थांबल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांची खेळणी,टाळ, मृदूंग, तुळशीच्या माळा, हळद-कुंकू, अष्टगंध, चुरमुरे, लाह्या, बत्तासे, असा प्रासादिक साहित्याचा माल विविध   व्यापऱ्यांच्याद्वारे किरकोळ दुकानदारांकडे येत आहे. मुंबई बाजारपेठेतून  खेळणी, धार्मिक साहित्य, , पुस्तके, टाळ , मृदंग, वीणा येत आहेत. तर गुजरात बाजारपेठेतून चुरमुरे, लाह्या येत असताना  कोल्हापूर भागातील मुरमुऱ्याला ही मोठी मागणी असते. 

या अगोदर पंढरपूर शहरातच चुरमुरे भट्या होत्या. मात्र काळाच्या ओघात भट्या विविध कारणांनी बंद पडल्या. त्यामुळे परराज्यातून माल मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. माघी वारीसाठी चार ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने ते परतीच्या वाटेवर मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यानुषंगाने पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी प्रासादिक साहित्य भरण्यावर जोर दिल्याचे चित्र पंढपूरात दिसून येत आहे.