धनगरवाड्यातील ७० वर्षाच्या लढ्याला यश ; गट नंबर २२१/२२२ मधील २०० एकर जमीन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने होणार नावावर
- आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश
- ७० वर्षांपासूनच्या धनगर समाजाने उभा केला होता लढा
- आ. मानसिंगराव नाईक यांच्या सातत्याच्या प्रयत्नांना आले यश
- आमदर मानसिंगराव नाईक ॲक्शन मोडमध्ये
लोकमान्य टाइम्स : मुंबई
मणदूर-धनगरवाडा (ता. शिराळा) येथील गट नंबर २२१ व २२२ मधील दोनशे एकर जमिन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने त्यांच्या नावावर करावी. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दहा दिवसात करावी, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी दिले.
बुधवारी (दि २४ ) मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने सकाळी साडे नऊ वाजता शिराळा तालुक्यातील मणदूर-धनगरवाडा येथील जमिनी हस्तांतरणाबाबत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीस सहकार मंत्री मा. ना. दिलीप वळसे-पाटील, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेनुगोपाळ, उपविभागीय अधिकारी वाळवा श्रीनिवास अर्जुन, शिराळ्याच्या तहसीलदार शामला खोत-पाटील, धनगरवाडा येथील ग्रामस्थांचे प्रतिनिधी बाबूराव डोईफोडे हे प्रत्यक्ष उपस्थित होते तर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विभागीय वन अधिकारी स्नेहलता पाटील हे ‘‘व्हीडीओ कॉन्फरन्सने’’ जोडले होते.
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील मणदूर गावातील गट नंबर २२१ व २२२ मधील २०० एकर जमीन निर्वनीकरण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने २५ नोव्हेंबर १९६६ रोजी विनोबाग्राम सहकारी सोसायटीच्या नावे कसण्यासाठी दिली होती. या सोसायटीचे सदस्य हे प्रामुख्याने धनगर समाजातील होते. नंतर १९७५ साली सदर सोसायटी अवसायनात निघाली. त्यावेळी सदरची जमीन शासनाकडे जमा करण्यात आली.
आज या जमिनीत सोसायटी सदस्यांच्या वारसांच्या वहिवाटीत असून तेथे धनगरवाडा नावाची वस्ती आहे. तेथील लोकांना अन्य कोठेही जमीन नसून दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नाही. जमीन नावावर नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. सदरची जमीन अत्यंत दुर्गम भागात असून गट नं. २२१ व २२२ मधील २०० एकर जमीन सोसायटी सदस्यांच्या वारसांना कब्जे हक्काने मिळण्यासाठी त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
आपण व महसूल मंत्री महोदयांच्या उपस्थितीत हा विषय मार्गी लावून त्यांची मागणी मान्य करावी, अशी आग्रही मागणी केली. त्याबाबत उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा होऊन वरील निर्णय ना. अजितदादानीं घेतला. त्यामुळे सुमारे ७० ते ७५ वर्षांपासूनची असलेली मणदूर-धनगरवाडा ग्रामस्थांची मागणी अखेर पूर्ण झाली.