कोल्हापूरराजकीयसांगली

देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर पाळणार का शब्द ? शिराळा विधानसभा मतदारसंघाला मिळणार सम्राट महाडिकांच्या रूपाने तिसरा आमदार

  • भाजपला १३२ जागा , महायुतीला २३४
  • शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख आमदार
  • उमेदवारी अर्ज माघारीनंतर सम्राट महाडिकांचा उचित सन्मान करणार
  • शिराळा जाहीर सभेत फडणवीस , दरेकर यांनी दिला होता शब्द
  • शिराळा मध्ये कमल फुलविण्याची सम्राट महाडिकांच्यावर जबाबदारी
  • महाडिक कुटुंबाने जी – जान एकत्रित करून केला होता प्रचार

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक निकालात शनिवारी (दिनांक २३) महायुतीला २८८ पैकी २३४ जागांवर विजय मिळविला. महाविकास आघाडीला फक्त ४६ आणि इतर ०४ जागा मिळाल्या. २०१९ प्रमाणेच २०२४ च्या निकालात ही (१३२ जागा पटकावीत) राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला. हे जरी खरे असले तरी भाजपाने काही झाले तरी यावेळी विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करीत अनेक बंडखोरांना अर्ज माघारीच्या वेळी अर्ज मागे घेण्यात यश मिळविले होते.

त्यात शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी सत्यजित शिवाजीराव देशमुख यांना मिळाल्यानंतर दुसरे इच्छुक सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज भरला होता. तो अर्ज मागे घेतला तर निश्चित सत्यजित देशमुख विजय होतील असा सर्व्हेचा अंदाज होता; त्याअनुषंगाने महाडिक यांचा अर्ज माघार घेण्यासाठीच्या चर्चेसाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांनी हेलिकॉप्टर पाठविण्याची राज्यातील ती पहिली वेळ होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत सम्राट महाडिक यांनी अर्ज माघार घेत सत्यजित देशमुख यांना विजयी करण्याचा विडा सम्राट आणि टीम ने उचलला आणि तो सत्यात ही आणला. त्यात विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदार संघात गोपीचंद पडळकर विजयी झाल्याने त्याची रिक्त झालेल्या जागेवर किंवा इतर जागेवर सम्राट महाडिक यांना विधान परिषदेची लॉटरी लागू शकते , अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदार संघात सम्राट यांच्या माध्यमातून तिसरा आमदार मिळणार अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शिराळा विधानसभा मतदार संघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे विश्वासू आणि शिराळा विधानसभा मतदार संघाचे दोन वेळा नेतृत्व केलेले तत्कालीन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात महायुतीकडून भाजप चे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी जवळपास २३ हजार मताधिक्याने विजय मिळविला. हा विजय मिळविण्यासाठी २५ वर्षापासून सत्यजित देशमुख अविरत प्रयत्न करत असताना त्यात त्यांना २०२४ ची वाट पाहावी लागली. हे जरी खरे असले तरी या यशात महत्त्वाचा वाटा हा सम्राट महाडिक आणि टीमचा आहे असे विजयानंतर आमदार सत्यजित देशमुख यांनी मान्य केले आहे. या विजयात महाडिक यांच्याबरोबरीने खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे व त्यांचा जनसुराज्य पक्ष, आमदार सदाभाऊ खोत व त्यांचा रयत क्रांती पक्ष, आर.पी.आय.आठवले गट, एकनाथ शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ॲड. भगतसिंग नाईक, रणजीत नाईक, यांचा सिंहाचा वाटा आहे.

महाडिक बंधू यांचा कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात राजकीय पगडा दिसून येत आहे. त्यामध्ये माजी आमदार महादेव अप्पा महाडिक, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक , कोल्हापूर मध्ये कालच्या निकालात काँग्रेसचे तत्कालीन आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदार झालेले अमल महाडिक , कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, भाजप प्रदेश सदस्य सम्राट महाडिक , पंढरपूर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांचे वर्चस्वाचा भाजप आणि महायुतीला फायदा होत आहे. त्यामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेत सम्राट महाडिक यांना संधी मिळणार अशी चर्चा रंगली आहे.