हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे ; त्यामुळे याबाबत संसदेत प्रश्न मांडणार
- खा. सुप्रीया सुळेंनी अजित पवार आणि अमित शहा गुप्त भेटीवर उपस्थित केले अनेक प्रश्न
- राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात
- उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल
- हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याची सुप्रिया सुळे यांनी केली टीका
लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन
अमित शहा यांना भेटण्यासाठी मुळात अजित पवार वेष बदलून का जात होते? त्यांच्यात इतके काय शिजत होते? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करीत हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत संसदेत प्रश्न मांडणार असून या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे असे मत माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी व्यक्त केले. खरे तर, अजित पवारांनी पत्रकारांशी बोलतांना मी सत्ता नाट्यावेळी वेष बदलून दिल्लीला जायचो. वेगळ्या नावाने बोर्डिंग पास काढायचो असा खुलासा केल्याच्या वक्तव्यावरून राज्यांतील राजकारणाने उचल खाल्ली आहे.
विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे
सुप्रिया सुळे याबाबत बोलतांना म्हणाल्या की, “राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते नाव बदलून प्रवास करतात. अजित पवारांनी असे केले. उद्या एखादा अतिरेकी हेच उदाहरण घेऊन असे कृत्य करेल. हा पूर्णपणे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. याबाबत मुंबई, दिल्ली विमानतळासह एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे. एअरलाईन्सने ज्यांना ओळखत नाही त्यांना प्रवासाची परवानगी कशी दिली? आम्हालाही आदर कार्ड दिले जाते. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानेही याबाबत उत्तर दिले पाहिजे”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
एकीकडे आरोप, एकीकडे भेट
त्या पुढे म्हणाल्या, उद्या एखादा अतिरेकी देशात आला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मुळात अजित पवार चोरून वेष बदलून का अमित शहा यांना भेटायला येत होते. त्यांच्यात असे नेमके काय शिजत होते? असा सवाल सुळेंनी केले आहे. त्या म्हणाल्या विशेष म्हणजे अजित पवार त्यांच्यासोबत गेले त्याच्या केवळ पाच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी अजित पवारांवर आरोप केले. एकीकडे मोदी अजित पवारांवर आरोप करत होते आणि दुसरीकडे अजित पवार अमित शहा यांची भेट घेत होते”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.