महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 🎇 नंतर ? मतदारांची चांदी ; इच्छुकांची दमछाक
- जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुका जाहीर
- महाराष्ट्र विधानसभेची २६ नोव्हेंबर ला संपणार मुदत
- तीन वेळा हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्या होत्या एकत्र
- हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक होणार वेगवेगळी
- दिवाळीनंतर निवडणूक होण्याच्या संकेतामुळे उमेदवारांची होणार दमछाक
- दिवाळी तोंडावर असल्याने मतदारांची होणार चांदी
लोकमान्य टाइम्स : संजय संपतराव शिंदे
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका ह्या एकत्रित होत होत्या. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन वेळा त्या एकत्रित घेण्यात आल्या होत्या; परंतु यावेळी जम्मू काश्मीर बरोबर हरियाणा विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुका ह्या नोव्हेंबर मध्ये होतील असे संकेत निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान हे दिवाळी झाल्यानंतर होणार असल्याने ऐन दिवाळीत मतदारांची चांदी होणार असून इच्छुकांची मात्र दमछाक होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुका कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणूक एकत्रित जाहीर होईल असा जो अंदाज बांधण्यात येत होता त्याला यावेळी छेद मिळाल्याचे बोलले जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने एका वेळी दोनच राज्यात विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय यावेळी जम्मू काश्मीर मध्ये दशकभराच्या कालावधीनंतर विधानसभेची निवडणूक जाहीर होत आहे. या केंद्रशासित प्रदेशात निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सैन्यदलाच्या मोठा फौजफाटा तैनात करावा लागणार आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर मधील निवडणूक झाल्याशिवाय आम्ही इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार नाही असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना स्पष्ट केले.
त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक या वेगवेगळ्या होणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. त्यात महाराष्ट्र विधानसभा मुदत २६ नोव्हेंबर ला संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात महायुती आणि त्यांचे मित्र पक्ष व महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष यामध्ये खरी लढत होणार आहे. तसेच विविध लहान पक्ष असणारे या दोन मोठ्या प्रवाहांना टक्कर देण्यासाठी तिसरी आघाडी करून आव्हान देण्याची ही चाचपणी सुरू आहे. त्यात मराठा , ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही केंद्रस्थानी असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील हे कोणीच आता सांगू शकत नसले तरी प्रत्येक पक्ष या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे. त्यादृष्टीने पूर्ण महाराष्ट्र विविध पदयात्रा काढून पिंजून काढण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर दिला आहे.
हे जरी खरे असले तरी निवडणूक दिवाळी नंतर होणार असल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ऐन सणासुदीच्या काळात निवडणुका येणार असल्याने मतदरांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मतदारांना खुश करण्यासाठी इच्छुकांना त्यांचा इच्छा पूर्ण कराव्या लागणार आहेत हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. या त्यांच्या इच्छा पूर्ण करतात करता इच्छुकांची मात्र दमछाक होणार आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे.