महाराष्ट्रराजकीयसातारा

अजितदादा शब्दाचे पक्के ; नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

  • नितीन पाटील यांनी राज्यसभेसाठी भरला अर्ज
  • लोकसभा निवडणुकीसाठी होते सातारा मधून इच्छूक
  • राष्ट्रवादीने भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना सोडली होती जागा
  • नितीन पाटीलाना जूनमध्ये राज्यसभेवर पाठविणार; अजितदादा यांचा होता शब्द

लोकमान्य टाइम्स : संजय संपतराव शिंदे

वाई खंडाळ्याचे आमदार मकरंद आबा पाटील यांचे बंधू सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल आदी उपस्थित होते. नितीन पाटील यांना जूनमध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवितो असा शब्द साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाई च्या जाहीर सभेत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या समोर दिला होता. तो शब्द नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन अजितदादा यांनी खरा केला आहे. ते राज्यसभेवर बिनविरोध निवडून जाणार हे नश्चित आहे.

राज्यसभेची उमेदवारी दाखल करताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील. यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, खा. प्रफुल पटेल, आमदार मकरंद पाटील आदी

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि मित्र पक्षाचे महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लाऊन अजितदादा पवार यांच्यासहित त्यांच्या ४४ आमदारांना महायुतीत सामील करून घेत अजितदादा यांना उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पद बहाल केले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी जागांची अदलाबदल करण्यात आले. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदार संघ आपल्याकडे ठेवण्यासाठी अजितदादा यांनी आटोकाट प्रयत्न केला. तर काही झाले तरी यावेळी सातारा लोकसभा निवडणूक लढविणार असा पवित्रा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतला होता. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असा सल्ला देण्यात आला.

जूनमध्ये राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा ताई पवार यांना जाहीर झाल्यानंतर नितीन पाटील यांना दिलेल्या शब्दाचे काय ? या मथळ्याखाली लोकमान्य टाइम्स ने दिले होते वृत्त

परंतु यावेळीची निवडणूक ही भाजप कडूनच लढणार असा पवित्रा छत्रपती उदयनराजे महाराज यांनी घेतला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून वाई खंडल्याचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांनी ही जोरदार तयारी केली होती. काही झाले तरी माघार नाही असा पवित्रा त्यांनी ही घेतल्याने महायुतीमध्ये सातारा लोकसभा जागेवरून तिढा निर्माण झाला होता. अखेर या जागेच्या तडजोडीमध्ये ही जागा भाजप पक्षाला सोडण्यात आली. त्यामुळे नितीन पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. मात्र काही झाले तरी महायुतीची ही जागा निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी चंग बांधला.

त्याअनुषंगाने नाराज नितीन पाटील यांना जूनमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या उमेदवारीवर नितीन पाटील यांना खासदार करतो असा शब्द देत छत्रपती उदयनराजे महाराज यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन वाई खंडाळा विधानसभा क्षेत्रातील जाहीर सभेत केले होते. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात स्वतःला झोकून देऊन काम केले.

सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीने सर केला. छत्रपती उदयनराजे महाराज खासदार झाले. त्यामुळे अजितदादा यांनी दिलेल्या शब्दानुसार जूनमध्ये जाहीर झालेल्या राज्यसभेवर नितीन पाटील यांना संधी मिळेल असे वाटत होते ; परंतु या जागेवर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. त्यामुळे जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो हा शब्द फिरविल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात निर्माण झाली होती.

नितीन पाटील आणि आमदार मकरंद आबा पाटील ही नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात आता दोन पैकी एक जागा भाजप ने राष्ट्रवादी काँग्रेस ला देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे त्या जागेवर अनेकांनी फिल्डींग लावली होती ; परंतु अजितदादा यांनी नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देत वाई खंडाळ्याच्या जाहीर सभेत दिलेला शब्द खरा करून दाखवित अजितदादा दिलेल्या शब्दाला जगणारा नेता अशी प्रतिमा पुन्हा उजळून निघाली आहे.