पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकडे..?
- महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षांना अंगावर घेण्याची धमक
- कार्यकर्त्यांना बळ देणारा आमदार
- अब की बार १०० पार स्वप्न पूर्ण करण्यासाठी होणार प्रयत्न
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची २५ वर्षाची एकहाती सत्ता २०१७ मध्ये उलथून टाकण्यात भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आणि सद्या इतर विरोधी पक्षासह महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांना अंगावर घेण्याची धमक ठेवणारे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ‘पैलवान’ महेश लांडगे यांच्याकडेच या निवडणुकीचे नेतृत्व दिले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळत सध्या जोरावर आहे.

जवळपास सव्वा ते साडे तीन वर्षे महानगरपालिकेची निवडणूक रखडली होती. त्या निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार निवडणुका होणार असल्याने एकूण ३२ प्रभागामध्ये १२८ नगरसेवक निवडून द्यावायचे आहेत. त्यासाठी चार सदस्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली आणि भोसरीचे आमदार पैलवान महेश लांडगे यांच्या साथीने २०१७ च्या महापालिका निवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती २५ वर्षाची सत्ता उलथून टाकत १२८ पैकी ७८ (कमळ चिन्हावर ७७ आणि भाजप पुरुस्कृत ०१) नगरसदस्य निवडून आणत जगताप -लांडगे जोडीने अशक्यप्राय विजय प्राप्त केला होता. या दैदीप्यमान विजयानंतर २०२२ च्या निवडणुकीत १०० नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न दिवगंत आमदार जगताप यांनी पहिले होते. २०१७ ते २०२२ हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ओ बी सी आरक्षण मुद्द्यावरून निवडणुका जवळपास साडे तीन वर्षे पुढे ढकलल्या. दरम्यान २०२३ मध्ये आमदार जगताप यांचे निधन झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना अंगावर घेण्याची धमक दिवंगत आमदार जगताप यांच्या मध्ये होती. पक्ष वाढीसाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यामुळे शहरातील विरोधी पक्षातील पदाधिकारी त्यांना टरकून असायचे. त्यांच्या निधनानंतर शहर भाजपामध्ये निर्माण झालेली पोकळी आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांना अंगावर घेण्याची धमक आणि जिगर फक्त भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यामधे असल्याचे शहरातील विविध कार्यक्रमामध्ये दिसून आले आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाकडून आमदार पैलवान महेश लांडगे यांच्याकडेच नेतृत्व दिले जाईल अशी चर्चा पक्षात आहे.
पिंपरी चिंचवड शहर भाजपा मध्ये आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी आमदार अश्विनीताई जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सदस्य आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश पातळीवरील विविध पदावर काम करणारे पदाधिकारी, शहर व जिल्हा कार्यकारिणी मध्ये काम करणारे प्रमुख शेकडो पदाधिकारी काम करीत आहेत.
मात्र प्रत्यक्षात संबंधित नेते व्यासपीठवर उपस्थित असताना आपल्या पक्षाने काय विकास कामे केली ती ठणकावून सांगण्याची धमक फक्त आणि फक्त अनेक वेळा आमदार पैलवान महेश लांडगे यांनीच दाखविली असल्याने केंद्र, राज्या प्रमाणे पिंपरी -चिंचवड महापालिकेमध्ये ही पुन्हा पक्षाला नंबर एक करून दाखविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडेच नेतृत्व सोपविले जाईल असा विश्वास पक्षांतर्गत व्यक्त केला जात असून त्याला पक्षातून दुजोरा दिला जात आहे.

