पिंपरी चिंचवडराजकीय

शब्दाचे पक्के असणारे दादा लांडे यांना दिलेला शब्द पाळणार का ?

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे लक्ष
  • भाजपाने दिले शहरात दोन विधान परिषद सदस्य
  • अजितदादा शहरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी देणार का राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या माध्यमातून ताकद

लोकमान्य टाइम्स : संजय संपतराव शिंदे

‘देर आये दुरुस्त आये ‘ नुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जून महिन्यात खासदार करतो म्हणाले असताना ऑगस्ट महिन्यात वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील यांना राज्यसभेची खासदारकी बहाल केली. त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीला मुरड घालून त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचा प्रचार केला. त्याच धर्तीवर अजितदादा यांच्या आदेशानुसार २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतून माजी आमदार विलास लांडे यांनी माघार घेतली होती.

त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शरद पवार आणि अजित पवार असे गट पडले. अजितदादा यांचे खंदे समर्थक असणारे त्यांचे विश्वासू एक एक करून अनेक खंदे समर्थक शरद पवार गटात प्रवेश करत असताना ही विलास लांडे हे अजितदादा यांच्या बरोबर ठामपणे उभा आहेत. त्यामुळे ज्यावेळी राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड करण्यात येईल त्यावेळी दिलेला शब्द पाळून अजितदादा हे शब्दाचे पक्के यावर शिक्कामोर्तब करणार का ? याकडे लांडे समर्थक आणि शहरातील राजकीय वर्तुळातील व्यक्तींचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्रात गुरुवारी (दिनांक २२) दोन राज्य सभा सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले. त्यामध्ये प्रत्येकी एक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या सदस्याचा समावेश आहे. या निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यामध्ये भाजपकडून धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून नितीन काका पाटील यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान अजितदादा यांनी नितीन पाटील यांना जूनमध्ये खासदार करतो असा शब्द दिला होता. जूनमध्ये जाहीर झालेल्या राज्यसभेवर सूनेत्राताई पवार यांना खासदार की देण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर संधी मिळाली. त्याजागेवर अनेक जन इच्छुक होते ; मात्र अजितदादा यांनी नितीन पाटील यांचे नाव अंतिम करून त्यांना संधी देत ‘ जे मी बोलतो तेच मी करतो ‘ हा संदेश त्यांनी पक्षातील पदाधिकारी यांना दिला असल्याने विलास लांडे समर्थक आणि अजितदादा पवार गटात दिलासा मिळाला आहे.

दोन वेळा लोकसभा निवडणुकीतून फक्त दादा यांच्या आदेशामुळे विलास लांडे यांनी माघार घेतली. २०१९ मध्ये डॉ अमोल कोल्हे आणि २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार केला. लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी अशा एकूण ३९ विश्वासू सहकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

मात्र विलास लांडे यांनी मी अजितदादा यांच्याबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत विलास लांडे यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी अजितदादा यांनी या मागणीला हिरवा कंदील दिला होता असे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे अजितदादा जो शब्द देतात तो खरा करतात हे नितीन पाटील यांना राज्यसभा सदस्य करून खरा ठरविल्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारपदी ते विलास लांडे यांना निश्चित संधी देतील असा विश्वास लांडे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला आहे.