समरजीत घाटगे यांची महायुतीच्या कार्यक्रमाकडे पाठ ; कागल विधानसभेत मुश्रीफ विरुध्द घाटगे सामना रंगणार
- कोल्हापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
- घाटगे यांची मनधरणी करण्यात भाजप पदाधिकारी यांना अपयश
- खा. धनंजय महाडिक यांची मध्यस्थी विफळ
- शुक्रवारी समरजीत घाटगे यांच्या समर्थकांचा मेळावा
- ३ सप्टेंबर ला हातात घेणार तुतारी ; विश्वसनीय वृत्त
लोकमान्य टाइम्स : कोल्हापूर
महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दिनांक २२) कोल्हापुरात उपस्थित होते. या कार्यक्रमास कागल विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असणारे भाजपचे माजी कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे उपस्थित राहणार की नाही याबाबत चर्चा होती. भाजप कडून ते उपस्थित राहतील असा दावा केला होता ; मात्र घाटगे यांनी कोल्हापूर भाजप चा दावा खोटा पाडत या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे ते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून हातात तुतारी घेत महायुतीचे संभाव्य उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभेच्या रिंगणातून आव्हान देणार हे निश्चित झाले आहे.
अजित पवार यांनी महायुतीचे जागा वाटप निश्चित झाले नसताना कोल्हापूर दौऱ्यावर असताना कागल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे भाजप मध्ये नाराजीचा सुर उमटला. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थ असणारे समरजीत घाटगे यांनी काही झाले तरी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढणार असे जाहीर केले. त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घाटगे यांच्याबरोबर वाटाघाटी केल्याने घाटगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा झाली.
त्याअनुषंगाने त्यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते पक्ष सोडणार यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपमध्ये एकच खळबळ माजली. घाटगे यांनी हा निर्णय बदलावा यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक व इतर पदाधिकारी यांनी प्रयत्न केला. गुरुवारी (दिनांक २२) कोल्हापुरात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यास घाटगे उपस्थित राहतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला होता; परंतु घाटगे यांनी या मेलाव्याकडे पाठ फिरवित त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे नक्की केल्याचे समजते. त्याअनुषंगाने त्यांनी शुक्रवारी (दिनांक २३) समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून त्यामध्ये पुढील निर्णय घेणार आहेत.

