‘चिठ्ठी’ चिंचवड मतदारसंघात भोवणार..?
- चिंचवड मतदारसंघात भाजपमधील गटबाजी उघड
- चिठ्ठी प्रयोगात हम करेसो कायद्यालाच प्राधान्य ; इतर इच्छुकांना डावलले
- पक्षांतर्गत गटातटाला खतपाणी
- निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटणार
- भोसरी मतदारसंघात आमदार महेशदादा लांडगे यांच्या नावाचा दबदबा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
विधानसभा उमेदवार निवडीसाठी भाजपच्या प्रदेश स्तरावरून आयोजित करण्यात आलेल्या चिठ्ठी प्रयोगावर आक्षेप घेण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा कार्यकारिणी मध्ये ज्याचा वरचष्मा त्यांचीच नावे या चिठ्ठीत घुसडण्यात आली असल्याचे आरोप होऊ लागल्याने चिठ्ठी भाजप पक्षाला भोवणार ? अशा प्रतिक्रिया आता दबक्या आवाजात भाजप मध्ये सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर कसे मागे राहील..!
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप हे चिंचवड विधानसभेसाठी स्वतःच तीव्र इच्छुक आहेत. त्यांनी पक्ष निरीक्षक यांच्याकडे प्रथम क्रमांकावर स्वतःचे नाव, द्वितीय क्रमांकावर आमदार अश्विनीताई जगताप आणि तृतीय क्रमांकावर चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे यांची नावे पाठविल्याचे समजते . पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे, ते आपल्या नावाला विरोध करणार हे लक्षात घेऊन पक्ष निरीक्षक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला इच्छुकांनाच डावलले. त्यांचे पडसाद उमटून संबंधित इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी शंकर जगताप यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे चिठ्ठी प्रयोग चिंचवड विधानसभा मतदारसंघात ही भोवणार ? अशी चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे. तर दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार महेश लांडगे हेच प्रमुख दावेदार असल्याने आणि इतर कोण इच्छुक नसल्याने त्यांची उमेदवारी मात्र अंतिम झाल्याचे समजते.
उमेदवारांची निवड सोपी जावी म्हणून चिठ्ठी प्रयोग
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड सोपी जावी म्हणून प्रदेश भाजप कडून जिल्हास्तरावर चिठ्ठीद्वारे उमेदवार कळविण्याची फरमान जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. पक्षाची बैठक बोलवून सर्वानुमते त्यांच्या पसंतीची तीन नावे पसंती क्रमानुसार बंद लिफाफ्यात पक्ष निरीक्षकाकडे ती देण्यात यावीत असे आदेश देण्यात आले होते ; परंतु राज्यात बहुतांशी ठिकाणी या प्रक्रियेमुळे गोंधळ उडाल्याचे दिसले. जिल्हास्तरावर ज्यांचे बहुमत त्यांनी आपल्या मर्जीतील नावे चिठ्ठी द्वारे पक्ष निरीक्षक यांच्याकडे पाठविलेल्यामुळे राज्यात अनेक मतदारसंघात वाद उफळल्याचे दिसून आले.
चिंचवड विधानसभा मतदार संघात इच्छुकांना डावलले
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातून उमेदवार कोण असावा, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी भाजपने बोलविलेल्या बैठकीला इच्छुकांनाच डावलण्यात आले. आपल्या नावाला विराेध हाेऊ नये, यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पक्ष निरीक्षकांच्या बैठकीचे निमंत्रण दिले नसल्याचा आरोप इच्छुकांनी केला. त्यामुळे चिंचवड भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली.
बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते : शीतल उर्फ विजय शिंदे
निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून संघटनेचा शहर सरचिटणीस आहे. माजी नगरसेवक असतानाही बैठकीचे निमंत्रण दिले नव्हते. याबाबत निरीक्षकांकडे तक्रार केली असल्याचे माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे यांनी सांगितले.
शहराध्यक्ष यांचा मनमानी कारभार : चंद्रकांत नखाते
भाजप शहराध्यक्ष मनमानी कारभार करत असून पक्ष त्यांचा घरचा असल्यासारखा चालवत आहेत. त्यांच्या जवळच्या लाेकांना बाेलावून स्वतःचे नाव लिहून घेतले आहे. याबाबत प्रदेशच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे प्रदेश सदस्य चंद्रकांत नखाते यांनी सांगितले.
….आता तर जगताप घराण्यात उमेदवारी नकोचा पाढा
पस्तीस ते चाळीस वर्षे दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या शहराच्या राजकारणावर होल्ड होता. त्यांच्या प्रती जिल्हा आणि शहराच्या राजकारणात आदरयुक्त दरारा होता. त्यांचा शब्द शहराच्या राजकारणात प्रमाण मानला जात होता. त्यांच्या स्पष्टवक्ते पणामुळे त्यांच्या विरोधात कोणी ब्र शब्द उच्चारत नव्हते; परंतु त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची यावरूनच घरात गृहकलह निर्माण झाला. एक गट अश्विनीताई यांना तर एक गट शंकर जगताप यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होता. या स्पर्धेत अश्विनीताई यांना उमेदवारी देण्यात आली. त्या निवडून ही आल्या; मात्र त्यांच्या मताधिक्यात घट झाली.
नेमका कोणाच्या उमेदवारीला विरोध
२०२४ विधानसभेत उमेदवारी कोणाला मिळणार यावरून पुन्हा गृह कलह निर्माण झाला. त्यादरम्यान पक्षातील शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, शीतल उर्फ विजय शिंदे यांनी ही चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. आता उमेदवारी इतर इच्छुकांना द्यावी, जगताप कुटुंबात उमेदवारी देऊ नका; अन्यथा आम्ही पक्षाचे काम करणार नाही असा पवित्रा अनेक नगरसेवकांनी घेतला आहे. काही जणांनी त्यातून पक्षाला राम राम ही केला आहे. त्यामुळे हा विरोध नेमका अश्विनीताई जगताप की शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या उमेदवारीला आहे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार ज्ञात आहेत अशी चर्चा पक्षांतर्गत ही सुरू आहे.