मावळात राजकीय भूकंप ; सुनील शेळकेंना उमेदवारी जाहीर होताच महायुतीत राजीनामा सत्र ; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे अपक्ष लढणार : भाजप माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बापूंना निवडून आणण्याचा उचलला विडा
लोकमान्य टाइम्स : मावळ
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर बापू भेगडे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर केल्यानंतर आता भाजपची भूमिका समोर आली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसह मावळमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बंडखोरी केलेल्या बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला असून त्यांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यावर असाच अन्याय होणार का ?
मावळ विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून आमदार सुनील शेळके यांना अजितदादा पवार यांनी उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील तीव्र इच्छुक असणारे बापू भेगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला .आणि या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी यांच्यावर असाच अन्याय करणार का असा सवाल बापू भेगडे यांनी उपस्थित करून काही झाले तरी ही निवडणूक लढणाराच असा पवित्रा घेतला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अधिकृत उमेदवार शेळके यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांला राजकारणातून संपून टाकण्याची भाषा
बाळा भेगडे म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांची अवहेलना केली, ते आम्हाला राजकारणातून संपवू शकत नाही. छातीवर दगड ठेवून निर्णय घेत आहे. जनसंघापासून आम्ही भाजपचे काम करताे. गेल्या पाच वर्षांपासून कार्यकर्त्यांला राजकारणातून संपून टाकण्याची भाषा केली. खच्चीकरण केले. राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शेळके यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे पक्षाच्या पदाचा राजीनामा देऊन आम्ही बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही निवडणूक जिंकणारच आहाेत. पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा मोठा केले. तीनदा उमेदवारी दिली. आमदार, मंत्री केले. पण, मावळमध्ये पक्ष कार्यकर्ता वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माफी मागून निर्णय घेत आहे.