भाजप कडून ‘ताकाला जाऊन भांड लपविण्याचा’ प्रकार : शिवसेना बोध घेणार का?
- पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: ‘स्वबळ’ की ‘युती’? कोअर कमिटी ठरवणार
- भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका ठरवली आहे. २९ महापालिकमध्ये सर्वाधिक महापौर हे आपलेच विराजमान झाले पाहिजेत, यासाठी वरिष्ठाकडून आदेश आहेत. सध्या राज्यात नगर पंचायत, नगरपरिषदा निवडणुकाचे बिगुल वाजले आहे. यां निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे भाजपने रणनीती आखाली आहे त्यावरून हम करे सो कायदा याची प्रचिती येत असल्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनतेतून आणि विरोधी पक्षासह महायुतीतील इतर घटक पक्षामध्ये ही उमटत आहेत. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यात स्वबळावर की एकत्रित हा निर्णय कोअर कमिटी घेईल असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी चिंचवड मध्ये जाहीर केले असले तरी काय करायचे हे पक्षाने ज्या त्या ठिकाणी ठरविले असल्याने ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार कशासाठी अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने एकट्याने लढायची की युती करून, याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून शहर भाजपची कोअर कमिटी घेईल, आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोठे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. शनिवारी, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत व प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघठन सरचिटणीस अॅड.मोरेश्वर शेडगे,विकास डोळस, वैशाली खाडेय,मधुकर बच्चे,यांसह माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे सर्व नगरसेवक- नगरसेविका, हजारो पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रसंगी, बजरंग दलाचे विभाग पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (राकांपा) माजी नगरसेवक अरुण टाक, श्रीमती आशाताई सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ संतोष चौगुले, पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, कायदा आघाडी, शहरातील सर्व मंडले व विविध आघाडीच्या कार्यकारिणीची घोषित करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते वैचारिक भूमिका घट्ट धरून आहेत आणि ते पक्षाचा राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची ओळख जगभर पोहोचली आहे. फक्त भाजप हाच पक्ष देशाच्या हिताचा विचार करणारा अजेंडा घेऊन चालतो. बाकीच्या प्रादेशिक पक्षांचा अजेंडा हा कुटुंबावर आधारित असतो. आपला अजेंडा देश आणि देशाच्या फायद्यासाठी आहे.”त्यांनी कार्यकर्त्यांना ‘बूथ’वर ५१ टक्के मतांची लढाई लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आणि ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ चा मंत्र प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले.
‘शंभर पार’चा नारा आणि स्थानिक नेत्यांचा आग्रह
प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले, “शहरात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. मनपा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होईल. त्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचून पदवीधर मतदार नोंदणी वाढवावी.”
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘शंभर पार’चा नारा दिला व महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा संकल्प सोडला आणि शहराच्या विकासासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांनी जास्तीत जास्त अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

