भोसरीच्या आखाड्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्तादाची एन्ट्री ; महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी शरद पवार आक्रमक
- गावजत्रा मैदानात होणार सभा ; अनेकांचे प्रवेश होणार असल्याची चर्चा
- महायुतीला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे आणि काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कसली कंबर
- शरद पवार कोणता डाव टाकणार याकडे पिंपरी चिंचवड शहराचे लक्ष
- अजित गव्हाणे यांना मिळतोय मोठा जनाधार
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे एकजूट करून महायुतीला जोरदार धक्का देत ४८ पैकी ३१ जागेवर विजय मिळविला. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडी विरुध्द महायुती व इतर पक्षांमध्ये महाराष्ट्रात दिनांक २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्याअनुषंगाने महाविकास आघाडी विरुध्द महायुतीमध्ये मुख्य सामना होणार आहे. काही झाले तरी पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कंबर कसली आहे. लोकसभेतील पराभवांनंतर राज्यातील मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी विविध योजनांचा पिटारा उघडला आहे. तर महाविकास आघाडीने त्याच्या विरोधात रान उठवून लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्तेतून पायउतार करण्यासाठी कंबर कसली आहे. मतदानासाठी आठ दिवस बाकी असताना महायुती आणि महाविकास आघाडीतील स्टार प्रचारक यांनी आरोप प्रत्यारोपाच्यी राळ उठवली आहे. यामध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्री, खासदार यांनी तर महाविकस आघाडी कडून राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार यांनी महाविकास आघाडीसाठी प्रचाराचे रान उठविले आहे.
त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीसाठी मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. पवार ज्याठिकाणी सभा घेत आहेत तेथे ते विरोधातील महायुतीतील पदाधिकारी महाविकास आघाडीत प्रवेश करून घेत महायुतीतील घटक पक्षांना धक्क्यावर धक्के देत आहेत. ते जेथे सभा घेत आहेत तेथे कोण पक्ष प्रवेश करणार याबाबत पूर्ण राज्यात चर्चा होवू लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारण हे शरद पवारांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. त्याअनुषंगाने शरद पवार हे दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेवून महायुतीच्या निवडणुकीच्या धोरणानुसार जोरदार तोफ डागून राज्यभर महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केले आहे. महाविकास आघाडीच्या शरद पवार, उध्दव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले , बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या खासदार यांच्या सभासह युवा नेत्यांच्या सभानाही मोठा जनाधार मिळत असल्याचे दिसत आहे.
राज्यभर दौरे सुरू असताना शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी बुधवारी (दिनांक १३) पिंपरी चिंचवड शहरासह, पुणे ग्रामीण भागातील आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभासाठी शरद पवारांची तोफ धडधडणार आहे. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्यासाठी भोसरी येथील गावजत्रा मैदानात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते ही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा असून ती नावे गुपित ठेवल्याने नेमके कोणकोण यावेळी प्रवेश करणार, महायुतीतील कोणत्या घटका पक्षाला त्याचा फटका बसणार याबाबत बुधवारी होणाऱ्या गावजत्रा मैदानात सभेच्यावेळी चित्र स्पष्ट होणार आहे. काही झाले तरी यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील विधानसभा निवडणुकीमध्ये बद्दल घडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी शरद पवार यांनी अनेक ज्येष्ठ व युवा पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष आणि मित्र पक्ष एकत्रित ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचे दिसत आहे.
त्याअनुषंगाने अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे गट, काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांनी एकसंघ मोट बांधून भोसरी विधानसभा मतदारसंघात बद्दल घडविण्यासाठी कंबर कसल्याची जोरदार चर्चा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात उद्योगधंदे, आय टी पार्क आणण्यात आणि त्याच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराचे नाव जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध मिळविण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड शहराचा विकास हा त्यांच्या दूरदृष्टीमुळे झाला हे जिल्ह्यातील जनता वारंवार मत व्यक्त करीत आहेत.
त्याअनुषंगाने भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिन्ही जगासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसही उभी फूट पडल्यापासून शरद पवार आणि अजित पवार गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तर पुणे मध्ये भाजप आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने विजय मिळविला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी दोन्ही पवारांचात स्पर्धा रंगली आहे.
त्याअनुषंगाने ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद असे संबोधले जातात ते शरद पवार बुधवारी (दिनांक १३) भोसरी, पिंपरी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात ज्या मतदार संघाची जोरदार चर्चा आहे अशा भोसरी विधानसभा मतदारसंघात (कुस्ती, बैलगाडा आणि कबड्डी साठी प्रसिद्ध असणारे गाव) त्यांची जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणाची ही सत्ता असो चर्चा फक्त राजकारणात वस्ताद अशी बिरुदी ज्यांना मिळाली आहे अशा शरद पवार यांची सभा भोसरी मध्ये होणार असल्याने महाविकास आघाडीमध्ये उत्साह संचारला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित दामोदर गव्हाणे यांना काही झाले तरी विजय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव ठाकरे गट, काँग्रेस , आप आणि मित्र पक्षाच्या घटक पक्षांनी रात्रीचा दिवस केला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या राजकारणातील वस्ताद शरद पवार भोसरी ग्रामस्थांना काय कानमंत्र देणार, कोणाचे प्रवेश होणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.