पिंपरी चिंचवड

शंकर जगताप यांनी मिळविला १ लाख ०३ हजार ८६५ मताधिक्याने विजय

महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांना १ लाख ३४ हजार ४५८ मते

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

चिंचवड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज शनिवारी जाहीर होत आहे. या निवडणुकीत महायुतीचे भाजपा उमेदवार शंकर जगताप यांनी एक लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवीत विजयाची पताका उंचावली आहे. त्यांना २,३५,३२३ इतक मतदान झालं असून एकूण चोविस फेरीअखेर त्यांनी १,०३,८६५ मतांचं मताधिक्य राखलं आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांची झुंझ अपयशी ठरली असून, त्यांना केवळ १,३१,४५८ मतांवरच समाधान मानाव लागल असून त्यांना नवख्या उमेदवाराने पराभवाची धूळ चारली आहे. तर, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना यंदाही चिंचवडकरांनी नाकारलं असून त्यांना केवळ ४३२३ इतकीच मतं मिळाली आहेत.  त्याखालोखाल नोटाला ४३१६ टक्के मतं मिळाली आहेत. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते. यातून शहराध्यक्ष म्हणून त्यांचे पक्षसंघटन सिद्ध झाले. क्रीडा, सामाजिक, सहकार, कला क्षेत्रातील योगदानाची पोचपावतीच त्यांना आता या विजयातून मिळाली आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. उच्चशिक्षित नवा चेहरा म्हणून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला. तो आता सार्थ होताना दिसत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे ते धाकटे बंधू आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचे ते दीर आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सर्व निवडणुकांत प्रचाराची आणि मतदारसंघ सांभाळण्याची जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे होती, तर २०२३ मधील पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांच्या प्रचारमोहिमेची सर्व सूत्रेही त्यांच्याच हातात होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांत त्यांचा समावेश आहे.

चिंचवड मतदारसंघातील पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेले शंकर जगताप उच्चशिक्षित असून, त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी तसेच एमबीएचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शेती आणि बांधकाम हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी २००७ मध्ये पहिल्यांदा पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. ते २००७ ते २०१२ या कालावधीत नगरसेवक होते. त्यानंतर २०२२ मध्ये भाजपकडून त्यांची चिंचवड विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०२३ पासून ते भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत. शहराध्यक्ष म्हणून त्यांनी संपूर्ण शहरात नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत पक्षसंघटन केले आहे.