सत्ता स्थापनेत अजितदादांकडून ‘सौ सोनार की एक लोहार की’ चा प्रत्यय
- अजितदादानी मुत्सद्दीगीरीने मारले एका दगडात दोन पक्षी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यातच १३२ जागा , आर. एस. एस.ने ही फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवावे यासाठी आग्रह धरल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित झाले आहे.
त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा या शिंदे समर्थक आमदारांच्या आग्रहाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजितदादा यांच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचा आरोप करणाऱ्यासह लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो पराभव स्वीकारावा लागला त्याचे खापर अजितदादा यांच्यावर फोडणाऱ्या भाजपमधील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना ही अजितदादा यांनी ‘ सौ सोनार की एक लोहार की ‘ चा प्रत्यय देत त्यांनी मुत्सद्दीगीरीने ‘ एका दगडात दोन पक्षी मारल्या’ ची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एकसंघ शिवसेना यांनी युती म्हणून व काँग्रेस आणि एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी म्हणून निवडणुकीस सामोरे गेले. निकाल लागल्यानंतर युतीचे सरकार स्थापन होणार असे वाटत असताना शरद पवार यांनी राज्यात महाविकास आघाडी च्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि युतीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेला बरोबर घेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व सूत्रे सुपूर्द करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावे लागले. याची सल त्यांच्या मनात होती. अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते . दरम्यान आघाडीत सर्व आलबेल आहे असे नव्हते, निधी मिळत नाही , अजित पवार आमच्या आमदारांना निधी देत नाहीत अशी तक्रार खुद्द मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार करत होते. हा कच्चा दुवा पकडून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेतील खदखद केंद्रीय नेतृत्वाच्या कानावर घातली. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक पार पडल्यावर लगेच शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड पुकारत भाजप बरोबर हातमिळवणी केली.
आणि भाजप आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या साथीने पुन्हा महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले. भाजप केंद्रीय नेतृत्वाने ४० आमदारांना बरोबर घेऊन आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली. भाजपकडे त्यावेळी १०५ आमदार असताना ही आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा दावा असतानाही सत्ता टिकविण्यासाठी फडणवीस यांनी केंद्रीय नेतृताच्या आदेशाचे पालन केले. त्यानंतर एकसंघ राष्ट्रवादीत ही फुटीची बीजे रोवली गेलीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ४३ आमदारांना बरोबर घेऊन युतीच्या सरकारमध्ये सामील झाले. त्याठिकाणी त्यांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद बहल करण्यात आले. तसेच त्यांच्या समर्थकांना मंत्री मंडळात स्थान देण्यात आले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फूटी नंतर लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जगावर महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. महायुतीला फक्त १७ जगावर समाधान मानावे लागले. त्यामध्ये भाजप ०९, ०७ शिवसेना शिंदे गट , ०१ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळाले. या अपयशाचे खापर भाजपतील दुसऱ्या फळीतील नेते, आर एस एस ने व शिंदे गटाने अजितदादा यांच्यावर फोडले. तर महायुतीच्या सरकारधे काम करताना अजितदादा बरोबर काम करताना मळमळ होते असा आरोप शिंदे गटातील एका मंत्र्याने केल्याने खळबळ मजली होती.
तर महायुतीचे सरकार स्थापन होण्या अगोदर महाविकास आघाडी म्हणून एकत्रित मंत्रिमंडळात काम करत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक मंत्री आणि आमदार यांनी अजितदादा आम्हाला मतदारसंघासाठी निधी देत नसल्याची तक्रार करीत एकसंघ शिवसेनेतून बाहेर पडल्याचे स्पष्टीकरण देत होते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही अजितदादा गटाला कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र निकाल लागल्यानंतर अजितदादा गटाने ४१ जागा जिंकून सर्वांना ‘तोडत बोट घालण्याची वेळ ‘ आणली. महाराष्ट्राच्या राजकारणात १९९१ अजितदादा काम करीत आहेत. आजपर्यंतच्या अनुभवाचा वापर करीत त्यांनी समय सुचिता दाखविली. १३२ जागा भाजप ला मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व यावेळी फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करणार हे अनुभवी राजकारातून ओळखले होते.
त्यामुळे अजितदादा यांनी वेळ न लावता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप १३२, अजितदादा गट ४१ आणि ०५ अपक्ष आमदारांचा फडणवीस यांना पाठिंबा असल्याने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार यात काही दुमत नाही. यातून अजितदादा यांनी आजपर्यंतच्या राजकारणातील अनुभवाचा वापर करून मुत्सद्दीपणाची चुणूक दाखवित शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या कोंडीला आणि भाजपधील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला फडणवीस यांना पाठिंबा देत स्पीडब्रेकर लावून ‘ एका दगडात दोन पक्षी मारल्या’ चे दिसत आहे.