अमित शहांचा साई दरबारी ‘लेकी बोले सुने लागी’
- काम करताना प्रतिमा स्वच्छ ठेवा
- प्रतिमेला तढा जाईल अशी कामे करू नका
- मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने साई दरबारी, शिर्डी येथे भारतीय जनता पक्षातील मंत्री, पदाधिकारी यांचे शिबीर आयोजित केले होते. २०२९ विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपा असा नारा देण्यात आला आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ही सरपंच पदापासून ते महापौर, आणि पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद अध्यक्ष पर्यंत भाजपाचीच सत्ता प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी सर्वानी प्रयत्न करावयाचे आहेत आणि त्यादृष्टीने सर्वानी कामाला लागावे असा आदेश शिबिरात उपस्थित मंत्री, आमदार, पदाधिकारी याना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
त्यादृष्टीने सत्ताधारी मंत्र्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा. प्रतिष्ठेला तढा जाईल असे कोणतेही काम करू नये असा सज्जड दम मंत्र्यांसह आमदार, पदाधिकारी याना शहा यांनी दिला. त्यानंतर मंत्र्यांच्या आयोजित बैठकीत ही पक्षातील मंत्र्यांसह महायुतीमध्ये काम करत असलेल्या सर्वच मंत्र्यांनी ही यांचे भान ठेवले पाहिजे याबाबत ही सूचना केल्याचे समजते. पक्षाच्या मंत्र्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी ‘ लेकी बोले सुने लागी ‘ याची प्रचिती करून देत महायुती सहभागी असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंत्र्यांना ही अप्रत्यक्षरीत्या इशाराच दिल्याचे दिसत आहे.
साई दरबारी आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात समारोप करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन करताना काम स्वतःची प्रतिमा चांगली ठेवा, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असे कृत्य करू नका, मंत्र्यांनी जनतेशी, जास्तीत जास्त संपर्क ठेवावा , राज्य आणि केंद्रातील योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करा असा ही सल्ला दिला आहे.
त्यानंतर शहा यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील एका खासगी हॉटेलमध्ये दोन प्रमुख बैठक पार पडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामध्ये पहिली बैठक ही नवनिर्वाचित मंत्र्यासोबत , तर दुसरी बैठक भाजप कोअर कमिटी सोबत पार पडली. या दोन्ही बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या बैठकीत अमित शहा यांनी आपल्या मंत्र्यांना सज्जड दम दिल्याचे समजते. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात ही मार्गदर्शन करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामपंचायत पासून ते मोठ्या शहरातील महापालिका निवडणुकीमध्ये शत प्रतिशत भाजपची सत्ता येणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सर्व मंत्री, आमदार , पदाधिकारी यांनी जनतेमध्ये जाऊन मिसळले पाहिजे, राज्य आणि केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविल्या पाहिजेत.
त्यासाठी जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला पाहिजे. भाजप सह राज्य सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या इतर मंत्र्यांनी ही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. मंत्र्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचा सल्ला दिल्याने अप्रत्यक्षरीत्या इतर घटक पक्षातील मंत्र्यांना ही काम जनसामान्यांना लोकांना रुचेल असेच करा असा जणू इशाराच दिल्याची चर्चा मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.