मारकडवाडी येथे ईव्हीएमच्या विरोधात बॅलेट पेपरवर मतदान ; पोलिस प्रशासनाचा जमावबंदीचा आदेश ; गावकरी मतदानासाठी ठाम
- पूर्ण देशाचे लक्ष
- ईव्हींएम वर शंका उपस्थित करीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ठाम
- पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
- मतदान प्रक्रियेसाठी गावकरी ठाम
लोकमान्य टाइम्स : माळशिरस
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथे आज मंगळवारी (दि.३) बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा चाचणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीत लागलेल्या निकालामध्ये ईव्हीएमबाबत शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. याबाबत त्यांनी प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर चाचणी मतदानाची मागणी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली. यानंतर मारकडवाडी गावात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. अशातच आमदार उत्तम जानकर आणि मारकडवाडी ग्रामस्थ मतदान प्रक्रियेवर ठाम आहेत. काही झाले तरी मतदान प्रक्रिया पार पडणार असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे ईव्हींएम मशीन बाबत महाराष्ट्रात जे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याअनुषंगाने मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या पवित्र्याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्र भर विरोधक फक्त ईव्हींएम वर संशय व्यक्त करीत आहेत ; परंतु मारकडवाडीत त्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या आदेशानंतर ही ग्रामस्थ बॅलेट पेपर चाचणी मतदानासाठी ठाम असल्याने सर्वांच्या या गावाकडे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप उमेदवाराला पडलेल्या मताधिक्यामुळे गावकऱ्यांना संशय
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मारकडवाडी गावातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले. हे गाव परंपरागत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांना मानणारे आहे. जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असल्याने या गावातून जानकर यांना मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. असा गावकऱ्यांचे मत आहे. मात्र भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याने ईव्हीएमबाबत शंका घेऊन मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकशाहीसाठी ही प्रक्रिया आम्ही राबवित आहे
माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून १३ हजार मताने निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांना अपेक्षेप्रमाणे मताधिक्य मिळाले नाही. राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली. यानंतर आता जानकर समर्थकांनी मोहिते पाटलांची ताकद असताना मताधिक्य न मिळाल्याने बॅलेट पेपरवरील मतदानाचा निर्णय घेतला. जानकर आमदार झाले तरीही लोकशाहीसाठी ही प्रक्रिया आम्ही राबवत असल्याचे आता जानकर समर्थक सांगतात
ईव्हींएम मध्ये घोळ केल्याचा गावकऱ्यांना संशय
मारकडवाडीतून राम सातपुते यांना १००३ तर उत्तम जानकरांना ८४३ मतं मिळाली. गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली आहेत. सातपुतेंना फक्त १०० ते १५० मते अपेक्षित होती. तर जानकरांना दीड हजार पेक्षा जास्त मतं अपेक्षित होती. हे सगळं ईव्हीएममध्ये घोळ करुन केल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आणि तशी प्रक्रिया आज पार पडत आहे.