पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकीय

पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यात ही काका-पुतणे महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित

  • पुण्यात अजितदादा १२५ तर शरद पवार गटाला ४० जागा
    जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस ने मारली बाजी  
    लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकत्रित निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाहीर सभेनिमित्त आले असता त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे सुतावेच केले होते. त्यानंतर पुणे येथे झालेल्या बैठकीत ही पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होऊन पुणे येथेही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असल्याचे अंतिम झाले आहे. पुण्यातील एकूण जागेपैकी कोणी किती जागा लढायच्या याबाबत ही निश्चिती झाल्याचे समजते. त्यामध्ये अजितदादा गट १२५ तर शरद पवार गट ४० जागा लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.  त्याबाबत सोमवारी रात्रीपर्यंत पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीला हा मोठा दणका मानला जात आहे. तर भाजपने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील यादी प्रसिद्ध न केल्याने त्यांचे इच्छुक गॅसवर असल्याचे दिसत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली आहे.  १२८ जागेपैकी ११० जागा अजित पवार तर १८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देण्याचा फॉर्मुला निश्चित झाल्याचे समजते. किंवा १८ जागेमध्ये दोन चार जागा जास्तीच्या देण्यात येतील असे समजते. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याबाबत आजच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून पत्रकार परिषद घेऊन एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर करणार असल्याचे समजते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असल्याने महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे. कारण रविवार पर्यंत महाविकासआघाडीमध्ये महापालिका निवडणुकांसाठी कशा प्रकारे सामोरे जायचे यासाठी झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित महापालिका निवडणूक लढणार असून त्याबाबतचे जागावाटपचे सूत्र जाहीर केल्याने महाविकास आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बाजूला सारून आता निर्णय घ्यावे लागणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्व निवडणूक आपण एकत्रित लढूयात अशी विनंती दोन्ही नेत्याकडे करत होते. त्यादृष्टीने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका एकत्रित येऊन लढले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित यावे ही इच्छा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कर्यकर्ते व्यक्त करीत होते. त्याबाबत अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर  फलक लावून तशी मागणी ही करण्यात येत होती. या मागणीला खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकीमध्ये यश येताना दिसत आहे.  होम पीच असणाऱ्या पुणे जिल्ह्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यास सुरुवात करत असल्याने भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकाच छताखाली काम करेल असा विश्वास आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये   उत्साहाचे वातावरण आहे.