पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी -चिंचवडमधील  भ्रष्टाचाराबाबत भाजपला घेरण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी होणार एकसंघ

  • राज्यात एकमेकाला सावरणारे भाजप आणि राष्ट्रवादी आता उभा ठाकणार एकमेकासमोर

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मत विभागणीचा फायदा विरोधकांना होत आहे ;  हे न  कळण्याएवढे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी दुधखुळे नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढण्यासाठी वाटाघाटी सुरु झाल्या आहेत.

 राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर त्याबाबत घोषणा ही करण्यात आल्या आहेत. त्याचा पुढचा अध्याय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  विचारविनिमय सुरु झाल्याचे मत  अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. साहेब आणि दादा यांनी एकत्रित यावे ही दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा आहे हे आता  दडून राहिलेली नाही; हे जरी खरे असले तरी राज्यात  सत्तेत एकत्रित असणारे आणि एकमेकांच्या पक्षावर आरोप झाल्यानंतर एकमेकाला सावरणारे  भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आपला पक्ष वाढविण्याची संधी असलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप करणार का ? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस  महापालिका निवडणुकीमध्ये एकत्रित येणार का ? पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये तत्कालीन सत्ताधारी असणाऱ्या भाजपवर करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपवार अजित पवार आणि  शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा गट खांद्याला खांदा लावून विरोधात आवाज उठविणार का? याबाबत शहरवासियांच्यामध्ये चर्चा आहे.

राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांचा कर्यक्रम जाहीर  झाला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंच्यायत समिती निवडणूक होणार असून जानेवारी २०२६ मध्ये राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूरसह २९ महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष वाढीला मोठा वाव असतो. राज्यतील प्रत्येक पक्ष आपले सदस्य वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी व मित्र पक्ष मुंबई वगळता बहुतांशी ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसणार आहेत . याचे सर्वाधिकार बऱ्यापैकी स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. 

विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात दोन्ही  राष्ट्रवादी काँग्रेस बहुतांशी ठिकाणी एकत्र येताना दिसत आहे. त्याची सुरुवात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड तालुक्यातू सुरु केल्याची घोषणा ही केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील याना बरोबर घेऊन त्याबाबत पत्रकार परिषद घेत त्यांनी काम ही सुरु केले आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यात ही बहुतांशी ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितच लढणार असल्याचे चित्र  आहे. तोच कित्ता आता पुणे जिल्ह्यात ही गिरविण्यात येणार असल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी त्याबाबत सुतावेच केले आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसा  प्रस्ताव अजित पवार याना दिल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत अजितदादा यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीमध्ये आलेल्या प्रस्तावाबाबत विचारणा केल्याचे ही बहल यांनी आवर्जून सांगितले.  त्याबाबत सर्वच पदाधिकारी यांनी हिरवा कंदील दिला आहे असे स्पष्ट केले.  अंतिम निर्णय   साहेब आणि अजितदादा घेणार असून अजितदादा साहेबांची भेट ही घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी ही  भ्रष्टाचारी भाजपला रोखण्यासाठी आम्ही दोन पाऊले मागे येत  अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करण्यास तयार आहे.  भाजपने त्यांच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. या निवडणुकीत भ्रष्ट भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार  असल्याचे जाहीर केले. त्याबाबत आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहात का? असे विचारले असता  त्याबाबत बोलताना शहराध्यक्ष बहल म्हणाले की,  भाजपने भ्रष्टाचार केला आहे की नाही? याबाबत शहानिशा करू,  जो कोणी चुकीचे काम करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही रान उठविणार आहे; तो मग भाजप पक्ष का असेना,  असे मत व्यक्त करीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याचे संकेत दिले आहेत.