सांगली

… आता शिराळ्यात ही दोन्ही राष्ट्रवादी लढणार एकत्र 

  • शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक एकत्रिकरणामुळे भाजप-शिवसेनेपुढे अनेक  आव्हाने 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यात ही साहेबांची आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणुकाना सामोरी जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रिकरणाला बळकटी मिळत आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात त्याबाबत शिक्कामोर्तब झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या एकत्रिकरणामुळे शिराळा नगरपंच्यायत निवडणुकीत भाजप-शिवसेनेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. 

शिराळा विधानसभा मतदार संघात माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी आमदार आणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, सांगली जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक अशा गटात मतदारसंघ विभागला गेला आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा गट अस्तित्वासाठी धडपडत आहे. तर शिराळ्यातील नागरी प्रश्न घेऊन सातत्याने युवकांचे संघटन करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. प्रा सम्राट शिंदे तसेच प्रहार संघटनेचे बंटी नांगरे हे करताना दिसत आहेत. 

शिराळा नगरपंचायत  निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच गटातटाच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे. गेली चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ येथील सत्ता ही मानसिंगराव नाईक यांच्या ताब्यात राहिली आहे. तर काही झाले तरी यावेळी विधानसभेप्रमाणे यामध्ये बद्दल घडवून आणण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. हे जरी खरे असले तरी राज्य आणि स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळे असते हे या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या माध्यमातून अधोरेखित होताना दिसत आहे. राज्यात सत्तेत एकत्रित असणारे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी व मित्र पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांशी संघर्ष करत आहेत. 

शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार गट एकत्रित निवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. शिवाजीराव नाईक आणी मानसिंगराव नाईक यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या असून आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता सांगली जिल्ह्यात ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढण्यास सुरुवात झाली आहे.  त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ने एकत्रित निवडणूक लढावी असा प्रस्ताव दिल्याची माहिती पिंपरी -चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची जी इच्छा पहिल्यापासून होती तिला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश येत असल्याने त्यांच्यामध्ये साहेब आणि दादा एकत्रित यावेत यासाठी एक पाऊल पुढे पडत असल्याने त्यांच्यामध्ये उत्साह आहे.