महाराष्ट्र

….म्हणून माझं साहेबांच्यावर प्रेम नाही असा अर्थ होत नाही 

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणाऱ्यावर मोठे भाष्य 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

मी काही वेगळी राजकीय भूमिका घेतो म्हणून माझं साहेबांवर प्रेम नाही, असा अर्थ होत नाही. असा विचार करणं म्हणजे तुमच्या बुद्धीचा छोटेपणा आहे. एका बाजूला आदरणीय पवार साहेब आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार, त्यामुळे प्रश्न निर्माण होणारच. काहींचं प्रेम साहेबांवर का नसावं? असा सवाल त्यांनी बारामतीकरांना उपस्थित केला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “प्रस्ताव आला असल्याचा आणि त्यावर दोन दिवसांत निर्णय घेणार आहे” असे म्हणत दुजोरा दिला होता. दरम्यान, युतीच्या या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.

बारामतीत गुरुवारी (ता. १३) बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मनातल्या अनेक गोष्टी थेट बोलून दाखवल्या आहेत.

शरद पवार यांच्याबरोबर जाण्याचे संकेत

खासदारकीला असं झालं, आमदारकीला असं झालं, असलं काहीही तुम्ही मला सांगू नका. शेवटी सगळे मतदार हे आपलेच आहेत. असे पवार स्पष्ट करताना कोणीतरही पवार यांना थेट स्टेजवर चिट्ठी आणून दिली. या चिठ्ठीवर बोलताना पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले.

मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत

मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत. मी काय वरून पडलो होतो का? हे मला कसं विसरता येईल? तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. बारामतीकरांनी विधानसभेला मला लाखोंचं मताधिक्य दिलं ना? अरे, जरा दिलदारपणा वाढवा, मनाचा मोठेपणा वाढवा. आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, असे स्पष्ट करत पवार यांनी कार्यकर्त्यांनाही बेरजेचे राजकारण करण्याचा संदेश या निमित्ताने दिला.