महाराष्ट्रराजकीय

‘ सत्तेसाठी’ कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र 

सत्ता विकासासाठी की एकमेकाची जिरवा-जिरवी करण्यासाठी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

गेल्या महिन्याभरात मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या आणि ग्रामीण भागात  पक्ष वाढीसाठी महत्वाची असणारी जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रात सत्ता ताब्यात घेण्यासाठी  महायुतीत एकत्रित असणाऱ्या घटक पक्षातच स्पर्धा पहावयास मिळाली. सत्ता मिळविण्यासाठी सुसंस्कृत महाराष्ट्रात प्रथमच पालकमंत्र्यांना पोलिसांच्याकडून  धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.  जिल्हा परिषद सदस्य यांचे अपहरणं करण्यात आल्याची तक्रार ;  तर दुसरीकडे माझे अपहरण झालेच  नाही असे सदस्याने प्रशासनाला समक्ष येऊन सांगण्यात आले. 

 पोलीस प्रशासनाने मंत्र्यांना मारहाण केली असे खुद्द संबंधित  मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे हे प्रकरण पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यावरच उलटणार हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही.  (कारण सत्तेत एकत्रित असणारे मंत्री नंतर सत्तेसाठी  एकमेकांच्या गळ्यात गळे घालणार? हे प्रशासनात काम करणाऱ्यांच्या लक्षात येऊ नये याला काय म्हणावे ? ) येवढा आटापिटा ज्यासाठी सुरु आहे ती सत्ता कोणी खेचली यापेक्षा ती  मतदारांच्या हितासाठी की एकमेकांची जिरवाजिरवीसाठी याबाबत चर्चा मात्र रंगली आहे. सुसंकृत महाराष्ट्र  अशी ओळख पुसून ‘सत्तेसाठी’ कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी म्हणण्याची वेळ जिल्हा परिषदेसाठी मतदान करणाऱ्या मतदारांच्यावर आल्याची दिसत आहे. 

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड शुक्रवारी (दिनांक २०) पार पडली. या निवडणुकीत राज्यात सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच रस्सीखेच पहावयास मिळाली. एकूण ६५ सदस्यांचे बलाबल. पार पडलेल्या निवडणुकीत   भारतीय जनता पक्ष २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १५, स्वाभिमानी ०१, काँग्रेस ०१, अपक्ष ०१ असे सदस्य निवडूण आले. निवडणुकीमध्ये भाजपने   स्वतंत्र निवडणूक लढविली. 

तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजितदादा गटाने युतीत निवडणूक लढविली. निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वभामानी आणि काँग्रेसचे मिळून ३७ सदस्य झाले. तर भाजप आणि एका अपक्ष असे एकूण २८ जिल्हा परिषद सदस्य पाहता सातारा जिल्हा परिषद मध्ये भाजपला रोखण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यशस्वी होणार हे निश्चित होते.  त्याबाबत पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी चे मंत्री मकरंद पाटील यांनी विश्वास व्यक्त केला होता. तर काही झाले तरी भाजपचाच अध्यक्ष होणार आसा आत्मविश्वास बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला होता. 

भाजप सत्ता मिळविण्यासाठी सर्व गोष्टीचा अवलंब करणार हे मंत्री शंभुराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना जुनानुभव होता. त्याची दक्षता म्हणून  शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना एकत्रित पर्यटन सहलीला घेऊन गेले होते. व अध्यक्षपद निवडीच्या वेळी एकत्रित  जिल्हा परिषदमध्ये  मंत्री  देसाई आणि पाटील यांच्या  उपस्थित आणण्यात आले. दरम्यान भाजपने  अनिल देसाई आणि संदीप मांडवे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी शिवसेनेच्या बापू शिंदे यांचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसात दिली होती.  

जिल्हा परिषद आवारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य आले असता अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना पोलीस अटक करणार असल्याची कुणकुण पालकमंत्री देसाई यांना लागली. त्यामुळे त्या दोघांना आपल्या सॊबतच मंत्री देसाई यांनी  जिल्हा परिषदेत आणले. त्या दोघांना आत घेऊन जात असताना पोलिसांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यात जोरदार झटापट झाली. त्यात पालकमंत्री देसाई यांच्या हाताला दुखापत झाली.

 त्यात त्यांचा रक्तदाब वाढला. दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादीच्या देसाई आणि मांढवे या सदस्यांना अटक केली. त्यामुळे ते दोन्हीही सदस्य मतदानापासून वंचित राहिले. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पाच मते फुटल्याने सातारा जिल्हा परिषद मध्ये भाजपच्या डॉ प्रिया महेश शिंदे (शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे  कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी )  या अध्यक्ष तर राजू भोसले हे उपाध्यक्ष म्हणून निवडूण आले. 

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी भाजपने पोलीस प्रशासनाच्या मदतीने सत्ता प्रस्थापित केली असा गंभीर आरोप केला. मी पालकमंत्री असून ही पोलिसांनी मला मारहाण केली असा आरोप केला. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी दुजोरा दिला.   पोलीस प्रशासनाच्या कृतीचा  निषेध केला. पोलीस प्रशासनाच्या या कृतीचा  मंत्री मंडळाच्या बैठकीत जाब विचारणार असल्याचे ही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी मत स्पष्ट केले. 

सत्तेत एकत्रित असताना जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची हे दाखविण्यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा वापर करुन जर पालकमंत्री व इतर मंत्र्यावर  पोलीस बाळाचा वापर करीत असतील तर सत्ता मिळवून नेमके राज्यात सत्तेत असणारे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेसमोर काय आदर्श घालून देत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद, पंचाययत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचाययत निवडणुकीमध्ये आपापला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो.

 त्यामध्ये काहीही गैर नाही. मतदारांनी जो पक्षाना कौल दिला आहे, तो मान्य करुन पुढे जाणे आवश्यक आहे. जिथे मतदान कमी पडले, उमेदवार निवडूण आले नाहीत,  तेथे कामे करुन मतदारांच्या मनामध्ये आपल्या पक्षाचे, उमेदवाराचे स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.  जिथे सत्ता नाही मिळाली तेथे जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी सकारात्मक रित्या काम केले पाहिजे ; मात्र सत्ता मिळविण्यासाठी राज्यातील सत्तेचा गैर वापर करुन जर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याच सहकाऱ्यांचे रक्त सांडण्यापर्यंत मजल जात असेल तर यातून मतदारांनी काय आदर्श घ्यायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सत्ता मिळविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपनुसार भाजपने केले ते योग्य आहे की आयोग्य? हे येणारा काळ ठरवेल. तसे त्यांच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्रात सत्तेची फळे चाखणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही काही धुतल्या तांदळासारखी नाही? हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नसल्याची चर्चा राज्यभर आहे. फक्त आणि फक्त सत्ता मिळविण्यासाठी आणि  राज्याच्या नेतृत्वाच्या नजरेत भरण्यासाठी एकमेकांच्या विरोधात डावपेच खेळणे म्हणजे राजकारण नाही. महाराष्ट्रातील जनता विविध समस्यानी ग्रसली आहे.  इराक युद्धमुळे इंधन समस्या निर्माण होऊ लागली आहे.  त्याचा फटका शहरी भागासह, ग्रामीण भागाला ही बसताना दिसत आहे.

  ग्रामीण भागात पाण्याची समस्या आवसून उभी राहिली आहे.  अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.  सत्ता मिळविण्यासाठी राज्यात सत्तेत एकत्रित असणारे पक्षच विविध सत्ता केंद्रे हस्तगत करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा आणि प्रशासनाचा वापर करुन रक्तरंजित राजकारणास बढावा देत आहेत. त्यामुळे  ‘सत्तेसाठी कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ अशी म्हणायची वेळ महाराष्ट्रवासियांच्यावर आली आहे.