…त्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही
- स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण निर्णय
- मंत्रिमंडळाचा सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भरतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गुरुवार (ता. १४) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भरतीबाबत नवीन नियमावली केली आहे.
यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परिक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवड होणाऱ्या उमेदवारांबाबत स्पष्टता निर्माण होणार असून आरक्षणाच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि सुसंगत येणार आहेत.
राखीव प्रवर्गातील ज्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) या पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत घेतलेली नाही, अशा उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गातूनही करण्यात येणार आहे.
पण ज्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव , परीक्षेस बसण्याची संधी (परीक्षा शुल्क ही बाब वगळून) संधीमध्ये शासनाने दिलेली सवलत घेतलेली असेल, अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाही, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे.

