पिंपरी चिंचवडराजकीय

भोसरी ‘उमेदवारी’ कोण वस्ताद

  • महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी वरून रस्सीखेच
  • राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) उमेदवारीवर ठाम
  • उमेदवारी नेमकी कोणाला कार्यकर्ते संभ्रमावस्थेत
  • प्रमुख पदाधिकारी म्हणतायत लक्ष मात्र एकच महायुतीच्या उमेदवाराचा पाडाव

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी चिंचवड शहरात भोसरी, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. हे तीन मतदारसंघ असेल तरी ही सर्वाधिक चर्चा असते ती भोसरी विधानसभा मतदारसंघाचीच. महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे हेच उमेदवार असणार आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकांच्या यशानंतर महाविकास आघाडीची राज्यात जोरदार हवा असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे भोसरी उमेदवारी मध्ये कोण ‘ वस्ताद ‘ ठरणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वरवर तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उमेदवारी कोणाला ही मिळू दे आमचे लक्ष फक्त एकच महायुतीच्या उमेदवाराचा पराभव हेच आहे असे महाविकास आघाडी कडून स्पष्ट करण्यात येत असेल तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उमेदवारी आम्हीच मिळविणार असा विश्वास व्यक्त करीत असल्याने येथील उमेदवारीचा वस्ताद कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्याअनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती विरुध्द महाविकास आघाडी व इतर आघाड्या यामध्ये सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ने महायुतीला जोरदार धक्का देत ४८ पैकी ३० आणि एक बंडखोर काँग्रेस खासदार असे एकूण ३१ जागा पटकाविल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत ही आत्मविश्वास वाढला आहे. त्यात शरद पवार यांनी भाजप मधील दिग्गज इच्छूक आपल्याकडे खेचत महायुती ला धक्के देणे सुरूच ठेवल्यामुळे विधानसभा निवडणुकीत ही लोकसभेची पुनरावृत्ती होऊ शकते असा राजकीय क्षेत्रातील विश्लेषक मते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये काहीसे टेन्शन तर महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण सद्यस्थितीला दिसत आहे. महायुती मधील घटक पक्षांतर्गत वातावरण उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे. भाजप मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटावर नाराजी असल्याची ही चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्षात अंतर्गत नाराजीनाट्य सुरू आहे. फलकावर एकमेकचे छायाचित्र न टाकण्यापर्यंत प्रकरण जाऊन त्यामाध्यमातून प्रमुख नेत्याच्यामध्ये ही नाराजी उमटताना दिसत आहे.

महाविकास आघाडीमध्ये ही काही ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यायची यावर एकमत होताना अडचणी येताना दिसत आहेत. एकूण २८८ जागेपैकी कोणाला किती जागा द्यायच्या याबाबत अंतिम चर्चा झाल्या असून त्यावर शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात एकमत झाल्याचे समजते ; परंतु कोणाला कोणती जागा द्यायची यावर मात्र काही मतदारसंघात भिजत घोंगडे असल्याची चर्चा आहे. परंतु त्यावर महाविकास आघाडी म्हणून शरद पवार, उध्दव ठाकरे आणि नाना पटोले हे निर्णय घेणार असून महायुतीला सत्तेतून पायउतार करण्यासाठी काही जागेबाबत तडजोड करून महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणुकीसाठी सामोरी जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

त्याअनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट यांच्याकडून दावा करण्यात आला आहे. शरद पवार गटाकडून अजित गव्हाणे तर शिवसेनेकडून रवी लांडगे आणि सुलभा उबाळे यांनी दावेदारी केली आहे. सद्यस्थितीला महायुतीकडून भाजप आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी अंतिम असून त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. दहा वर्षात केलेली विकास कामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जात आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजित गव्हाणे, रवी लांडगे आणि सुलभा उबाळे त्यांनी केलेल्या नगरसेवक काळातील विकास कामे, पक्षांनी केलेली कामे या जोरावरच तसेच उमेदवारांच्या मते विद्यमान आमदार यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश, त्यांच्या आशीर्वादाने झालेला भ्रष्टचार हे मुद्दे घेऊन महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार मैदानात उतरले आहेत.

हे जरी खरे असले तरी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार की शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्व इच्छुक आमचे एकच लक्ष महायुतीच्या उमेदवाराचा पराभव असे सांगत आहेत. उमेदवारी कोणाला जरी मिळाली तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम प्रामाणिकपणे करणार असे ते सांगताना दिसत आहेत. हे जरी खरे असले तरी उमेदवारी आम्हालाच मिळणार असे इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत. त्यामुळे भोसरी उमेदवारी चा वस्ताद नेमका कोण होणार हे येणारा काळच ठरविणार आहे हे मात्र नक्की..!