पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली पुण्याची तटबंदी 

  • केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वाखाली राहुल कुल, महेश लांडगे, गणेश बिडकर आणि शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

मंगळवारी (दिनांक ४ नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच बाकी राहिलेल्या  जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असल्याने निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा  कंबर कसली आहे. 

त्यामध्ये पुणे जिल्ह्याचे योगदान महत्वाचे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरी भागात भाजपाची पक्कड मजबूत असून दक्षिण आणि उत्तर पुण्यात पक्ष वाढविण्यासाठी  मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्याला तटबंदी मजबूत करण्यासाठी आमदार राहुल कुल, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि गणेश बिडकर यांच्यावर जबाबदारी सोपावली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी (दिनांक ०५) जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी यांची नेमणूक करून संबंधित आमदार, प्रमुख पदाधिकारी, खासदार, मंत्री यांच्यावर ज्या -त्या जिल्हातील निवडणुकांची जबाबदारी सोपावली आहे. त्यादृष्टीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणी पुणे दक्षिण (बारामती ), पुणे उत्तर (मावळ ) ग्रामीण भागाच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारीचे वाटप केले आहे. त्यामध्ये आमदार कुल यांच्याकडे दक्षिण पुणे (बारामती), आमदार लांडगे उत्तर पुणे (मावळ ), आमदार जगताप (पिंपरी-चिंचवड) , गणेश बिडकर (पुणे शहर) ची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या पुणे जिल्हाचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांची नियुक्ती केली आहे. 

पुणे जिल्ह्यात लढत होणार आहे ती महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, मनसे, काँग्रेस हे पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता आहे. ते ही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटासमोर तगडे आव्हान उभे करू शकतात. त्यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात ही भाजप मजबूत स्थितीत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री तथा  पालकमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीला शह देण्यासाठी त्यांच्या टीममधील विश्वासू सहकाऱ्यावर जबाबदारी सोपावली आहे. 

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहर आणि ग्रामीण भागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी जनसंवाद उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस वर पुन्हा मतदारांनी विश्वास संपादन करावा यासाठी ऑन दी स्पॉट जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी मोहीम राबावली होती. त्याला विविध विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पवार यांचे ग्रामीण भागात वर्चस्व आहे. त्यांना काही करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. तसेच पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना विधानसभा उपाध्यक्षपद देऊन शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दिलीप वळसे, दत्ता मामा भरणे हे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तर पुणे म्हाडाचे अध्यक्षपद हे  शिवाजीराव आढळराव यांच्याकडे असल्याने पुण्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेचे वर्चस्व आहे. 

तर भाजपचे पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये वर्चस्व आहे. प्रामुख्याने पुणे दक्षिण आणि उत्तर भागातील काही नगरपालिका, नगरपरिषद तब्यात होत्या. त्यानुसार ग्रामीण भागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देत शहरी आणि ग्रामीण भागाचा समन्वय साधण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जे डाव टाकले आहेत ते यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीचे ही आव्हान

राजकारणातील वस्ताद आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार बापूसाहेब पठारे, शिवसेना उबाठा, काँग्रेस महाविकास आघाडी, मित्र पक्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे नवे मित्र मनसे हे पक्ष एकत्रित निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांचे होम ग्राउंड त्यात आता शेतकरी कर्जमाफी, मतांची चोरी हे विषय समोर आल्याने आणि मत चोरी विषयाला अप्रत्यक्षरित्या महायुतीतील मित्रपक्षातील मंत्र्यांनी अप्रत्यक्ष प्रतिक्रिया देऊन दिलेले बळ पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटापुढे हे मुद्दे आव्हान निर्माण करणार हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही.